Sangli: ‘चंदा-सेनापती’च्या संसारात नवा ट्विस्ट; सह्याद्रीत ‘सुभेदार’ परतला, वर्चस्वाचा संघर्ष पेटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:46 IST2026-02-21T17:45:24+5:302026-02-21T17:46:15+5:30
राधानगरी ते चांदोली २५० किमीचा थरारक प्रवास

संग्रहित छाया
विकास शहा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि कुतूहलाची बातमी समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग नर वाघ ‘सुभेदार’ याने अवघ्या दीड महिन्यात राधानगरी ते चांदोली असा तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करून अभ्यासकांना चकित केले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
चांदोली आणि राधानगरी यामधील सरळरेषेतील अंतर १०० किमी असले तरी, वाघाचा नैसर्गिक वावर आणि जंगलातील अडथळे पार करत सुभेदारने सुमारे २५० किमीचा प्रवास केला आहे. जानेवारीमध्ये सुभेदार राधानगरी अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला होता. महिनाभर राधानगरीत मुक्काम ठोकल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या मूळ अधिवासाकडे म्हणजे सह्याद्रीकडे कूच केली. त्याच्या अंगावरील पट्टेरी रचनेवरून (STR-T) त्याची ओळख निश्चित करण्यात आली आहे.
एकीकडे सुभेदारच्या प्रवासाची चर्चा आहे, तर दुसरीकडे चांदोलीत ‘चंदा’ आणि ‘सेनापती’ यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली आहे. ताडोबातून आलेल्या ‘चंदा’ने (STR-०४) चांदोलीत स्वतःची हद्द निर्माण केली आहे. अलीकडेच ती आणि ‘सेनापती’ (STR-०१) महिनाभर एकत्र वावरताना दिसले होते. कॅमेरा ट्रॅपमधील फुटेजमध्ये सेनापतींच्या मागोमाग चंदा जाताना दिसली आहे. वन्यजीव विभागाच्या मते, त्यांच्यात मिलन झाले असण्याची दाट शक्यता असून, चंदाच्या शारीरिक स्थितीत होत असलेल्या बदलांमुळे सह्याद्रीत लवकरच ‘नव्या पाहुण्यांचे’ आगमन होऊ शकते.
सुभेदारचा रंजक इतिहास
सुभेदार हा मूळचा राधानगरीचाच रहिवासी आहे. दि. २३ एप्रिल २०२२ रोजी तो पहिल्यांदा तिथे दिसला होता. त्यानंतर दोन वर्षे तिथेच राहिल्यावर दि. २८ ऑक्टोबर २०२४ ला त्याने पहिल्यांदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली होती. आता पुन्हा तो आपल्या जुन्या क्षेत्रात परतल्याने वन्यजीव विभागात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
चांदोलीत वर्चस्वाचा संघर्ष पेटणार का?
सेनापती आणि चंदा यांच्या मिलनानंतर आता ‘सुभेदार’च्या परतण्याने या व्याघ्र क्षेत्रात वर्चस्वाचा संघर्ष होणार की सुभेदार आपली वेगळी हद्द निर्माण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.