Sangli Crime: जतमध्ये सहा पिस्तुलांसह २० काडतुसे जप्त; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:17 IST2025-11-22T17:16:57+5:302025-11-22T17:17:25+5:30
आरोपीने अशा प्रकारच्या देशी बनावट पिस्तुलाची विक्री कोणास केली आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत

Sangli Crime: जतमध्ये सहा पिस्तुलांसह २० काडतुसे जप्त; दोघांना अटक
जत (जि. सांगली) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत शुक्रवारी जतमध्ये दोघांकडून सहा देशी बनावटीच्या पिस्तुलांसह २० काडतुसे असा एकूण ३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे.
जत शहरातील विजापूर रस्त्यावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी मारुती ऊर्फ बबलू श्रीमंत गलांडे (वय ३०, रा. चिठ्ठलनगर, जत) व आकाश सुरेश हजारे (वय २७, रा. घुट्टेवाडी, पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून सहा पिस्तुलांसह २० जिवंत काडतुसे, मोबाइल, दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर एक व्यक्ती देशी बनावटीच्या अवैध पिस्तुलाच्या विक्रीसाठी जत शहरातील विजापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवत संबंधित संशयित व्यक्तीची अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली.
त्याने तीन पिस्तूल व काडतुसे त्याचा मित्र आकाश सुरेश हजारे (वय २७, रा. घुट्टेवाडी, पाहुणेवाडी, ता. बारामती) याच्याकडे दिल्याचे तपासात सांगितले. दुसरा आरोपी आकाश सुरेश हजारे यास अटक करून त्याच्याकडून ३ पिस्तूल व १२ काडतुसे जप्त केले. आरोपीने अशा प्रकारच्या देशी बनावट पिस्तुलाची विक्री कोणास केली आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.व्ही. पोटे यांनी केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत.