सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 14:40 IST2022-10-25T14:31:49+5:302022-10-25T14:40:10+5:30
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी खा. पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडले होते

सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात
शिरढोण : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे गटाच्या शीतल अजय पाटील यांनी रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात प्रवेश केला. तशी छायाचित्रे सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली. खा. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी खा. पाटील व त्यांच्या पत्नी ज्योतीताई, नगरसेवक अजित माने व रणजित घाडगे यांची भेट घेतली.
फेब्रुवारीत झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक निवडून येऊन एकहाती सत्ता आली होती. मात्र आता २१ तारखेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी खा. पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडत बरोबरी केली. खा. पाटील आणि घोरपडे, सगरे यांच्या शेतकरी विकास आघाडी मधून घोरपडे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले होते. नगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन तीन दिवस होऊन गेले असताना घोरपडे गटाच्या शीतल पाटील यांनी रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात प्रवेश केला.
खा. पाटील यांनी राष्ट्रवादी नंतर आता घोरपडे गटाला देखील डिवचल्याने घोरपडे व खा. पाटील यांच्यात नवा संघर्ष बघायला मिळणार आहे.
कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी आम्हाला ज्या हेतूसाठी निवडून दिले आहे, तो साध्य होण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. प्रभागमध्ये विकासकामे व्हावीत, नागरी प्रश्न मार्गी लागावेत या हेतूने कार्यकर्त्यांच्या सहमतीने भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी खासदार गटात प्रवेश केला आहे. - शीतल पाटील, नगरसेविका, कवठेमहांकाळ.