Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:30 IST2025-10-04T12:30:11+5:302025-10-04T12:30:54+5:30
जयंत पाटील यांच्या पलूस तालुक्यातील राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता

Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश
पलूस / कुंडल : पलूस तालुक्यात आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निष्ठावान आमदार अरुण लाड यांचे पुत्र क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार अरुण लाड यांचे कुटुंब हे जयंत पाटील यांचे निकटवर्ती व विश्वासू म्हणून ओळखले जाते. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना जयंत पाटील यांनी ताकद पणाला लावून निवडून आणले होते. मात्र, आता अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड भाजपला साथ देणार असल्याने जयंत पाटील यांच्या पलूस तालुक्यातील राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपने याआधीच देशमुख बंधूंच्या माध्यमातून तालुक्यात स्थान घट्ट केले होते. त्यात आता शरद लाड यांचा प्रवेश झाल्यानंतर भाजपची ताकद याठिकाणी वाढण्याची चिन्हे आहेत. भाजप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील संघर्ष जगजाहीर आहे. त्यात भर म्हणजे गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा जिल्ह्यात टोकाचा संघर्ष आधीच पेटलेला आहे.
आता यात भरीस भर म्हणून लाड कुटुंबीयातील नव्या पिढीतील नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने ही उलथापालथ जयंत पाटील यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे पलूस तालुक्यातील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.
अरुण लाड हे अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच आहेत. ते पक्ष सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन प्रतिस्पर्धी पक्ष नांदण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून हिरवा कंदिल
लवकरच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे. यासाठी शरद लाड हे इच्छुक आहेत. यासाठी भाजप पक्ष नेतृत्वाकडून उमेदवारीबाबत लाड यांना हिरवा कंदील मिळाल्याने लाड भाजपमध्ये गेल्याची चर्चा आहे.
कार्यकर्त्यांची दोन दिवसांत बैठक घेणार आहे. त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षाबरोबर जिल्हाभरातील कार्यकर्तेही आम्हाला महत्त्वाचे आहेत. - शरद लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल