Sangli Crime News: अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने सात शेतकऱ्यांना ३५ लाखांचा गंडा, मिरजेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:23 IST2026-02-04T14:23:25+5:302026-02-04T14:23:54+5:30
कर्ज मंजूर झाल्यानंतर संशयित आरोपीने नवीन ट्रॅक्टर परस्पर इतरांना विकून टाकले.

संग्रहित छाया
मिरज : दीड लाख रुपये सबसिडीच्या आमिषाने भामट्याने मिरज पूर्व भागातील सात शेतकऱ्यांना सुमारे ३५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सचिन बळवंत कांबळे (रा. येळावी, ता. तासगाव) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकोचीवाडी (एरंडोली, ता. मिरज) येथील शेतकरी आनंदा हरी माने यांच्यासह मिरज पूर्व भागातील व्यंकोचीवाडी, संतोषवाडी व शिपूर येथील सात शेतकऱ्यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. सचिन कांबळे याने समाजकल्याण विभागात ओळखी असल्याचे सांगून समाजकल्याण विभागाच्या योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार, आनंदा माने, जितेंद्र मगदूम,दीपक सावंत (रा.व्यंकोचीवाडी), नीलेश भोसले (रा.संतोषवाडी), मारुती देसाई, सागर नाईक व बजरंग बाबर (रा. शिपूर) या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन कांबळे याने सातजणांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांतून ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी साडेचार ते साडेपाच लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. एकूण सुमारे ३५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर संशयित आरोपीने नवीन ट्रॅक्टर परस्पर इतरांना विकून टाकले.
नावावर कर्जाची नोंद झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर देण्याची मागणी केल्यानंतर कांबळे याने आज देतो, उद्या देतो, असे सांगत, गेले वर्षभर टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत आनंदा माने यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.