जिल्हा बँक शाखेतच मिळणार सातबारा, फेरफार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:30+5:302021-03-08T04:25:30+5:30

सांगली : कर्जप्रकरण करताना शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा, फेरफार किंवा खाते उतारा मिळविण्यासाठी चावडीत हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे थांबविण्यासाठी ...

Satbara, Ferfar will be available only at District Bank Branch | जिल्हा बँक शाखेतच मिळणार सातबारा, फेरफार

जिल्हा बँक शाखेतच मिळणार सातबारा, फेरफार

सांगली : कर्जप्रकरण करताना शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा, फेरफार किंवा खाते उतारा मिळविण्यासाठी चावडीत हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे थांबविण्यासाठी सांगली जिल्हा बँकेतच आता हे दाखले शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासंदर्भातील करार बँकेने केला आहे.

शासनाच्या जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेखच्या पुणे विभागाबरोबर सांगली जिल्हा बँकेने करार केला आहे. या करारानुसार आता कर्जप्रकरण करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला बँकेच्या कोणत्याही शाखेत सातबारा, फेरफार, खातेउतारा उपलब्ध होणार आहे. यासाठी येणारा खर्चही आता काहीअंशी कमी होणार आहे. बँकेचे सर्व्हर शासनाच्या सर्व्हरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा, फेरफार व खातेउतारा त्यांना मिळेल. डिजिटल सहीचे सातबारे हे कोणत्याही कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानले जाणार असल्याने बँकेसाठी व शेतकऱ्यांसाठी ही सुविधा क्रांतिकारी ठरणार आहे.

जिल्हा बँकेचे कर्जप्रकरण करताना आवश्यक असलेले उतारे मिळविताना शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यांना जलदगतीने कर्ज मिळत नव्हते. आता ही बाब सोपी व जलद झाली आहे. बँकेने गेल्या काही दिवसांत असे अनेक आधुनिक निर्णय घेऊन बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत. सॅटेलाईट इमेजद्वारे शेतीकर्ज वाटप, पीक पाहणी, त्याचे अहवाल तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बँक व शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. बँकिंग क्षेत्रात सर्व सोसायट्या संगणकीकृत करण्याचे पाऊलही बँकेने टाकले आहे. अशा योजना राबविणारी सांगली जिल्हा बँक ही राज्यातील पहिलीच जिल्हा बँक ठरली आहे.

कोट

बँकिंग क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर करून अचूक व जलदगतीने कारभार करण्याचे आमचे ध्येय होते. ते या योजनांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. सातबारा, फेरफार व खातेउताऱ्याची सोय प्रत्येक शाखेत होणार असल्याने शेतकऱ्यांचा त्रास वाचणार आहे. त्यामुळे या योजना भविष्यात बँकेच्या प्रगतीला मोठा हातभार लावतील.

- दिलीपतात्या पाटील, अध्यक्ष जिल्हा बँक, सांगली.

Web Title: Satbara, Ferfar will be available only at District Bank Branch