Sangli ZP, Panchayat Samiti Election: दाखल्यांमुळे समीकरणे बदलणार, ओबीसी गटात गर्दी वाढणार
By संतोष भिसे | Updated: October 29, 2025 18:45 IST2025-10-29T18:45:12+5:302025-10-29T18:45:47+5:30
कुणबी दाखले मिळालेल्यांना ओबीसी गटातून संधी

Sangli ZP, Panchayat Samiti Election: दाखल्यांमुळे समीकरणे बदलणार, ओबीसी गटात गर्दी वाढणार
संतोष भिसे
सांगली : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांत ओबीसी गटातील समीकरणे बदलणार आहेत. निवडणुका ओबीसींच्या जुन्याच आरक्षणानुसार होणार आहेत. तरीही ओबीसी गटातून आता कुणबी मराठा उमेदवारही उभारणार असल्याने तिकिटांसाठीही रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे.
जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या १२२ गणांसाठी निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या वर्चस्वासाठी राजकीय वातावरण तापले आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आदी पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे इच्छुकांची संख्या भलतीच वाढली आहे. यामध्ये कुणबी मराठा उमेदवारांचाही समावेश आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन अनेकांनी कुणबी प्रमाणपत्रे काढली आहेत. जिल्ह्यात कुणबीच्या ५२ हजारांवर नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी सुमारे ४५०० जणांनी तसे दाखलेही काढून घेतले आहेत. त्यापैकी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता जात पडताळणी समितीकडून दाखल्यांची पडताळणी आवश्यक आहे.
कुणबी मराठा उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून किंवा सर्वसाधारण उमेदवार म्हणूनही निवडणूक लढविण्याची संधी आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंनी त्यांची तयारी सुरू आहे. यामुळेच मूळच्या ओबीसींना आता उमेदवारीसाठी आणि निवडून येण्यासाठी स्पर्धा करावी लागू शकते. विविध पक्षांच्या नेत्यांनाही उमेदवारी वाटपावेळी मोठी कसरत करावी लागणार आहे.
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र असे काढा
शेताचे पूर्वीच्या सर्व्हे क्रमांकात जातीच्या नोंदी आहेत. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून ९ (३) ९ (४) उतारा मिळवावा. सर्व्हे नंबरची हक्क नोंदणी तहसीलदारांच्या रेकॉर्ड रूममध्ये मिळते. त्यावर कुणबी नोंद शोधता येते. भूमी अभिलेख कार्यालयात नमुना ३३ व ३४ मध्येही नोंदी आहेत. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये जन्म, मृत्यूच्या नोंदी कोटवार बुकात (गाव नमुना क्रमांक १४) असतात. त्यातही कुणबी नोंद असते. जुन्या पीकपेऱ्यांत, पोलिस ठाण्यात, कारागृहात गेले असल्यास, जुन्या मराठी शाळांत पूर्वजांच्या नावापुढे जातीची नोंद आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही गावनिहाय कुणबी नोंदी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात आपल्या पूर्वजाचे नाव शोधून व त्याची वंशावळ दाखवून कुणबी जात प्रमाणपत्र मिळविता येते.
- जिल्हा परिषदेतील एकूण जागा - ६१
- २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार - १७
- पंचायत समितीच्या एकूण जागा - १२२
- २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार - ३४