Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांचा वरचष्मा, वाळव्यात महायुतीला धक्का देत राष्ट्रवादीची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:14 IST2026-02-09T12:12:36+5:302026-02-09T12:14:46+5:30
महाडीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ गटात आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोरगाव गटात जयंत पाटील यांनी दोन्हीकडे हादरे दिले

Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांचा वरचष्मा, वाळव्यात महायुतीला धक्का देत राष्ट्रवादीची मुसंडी
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांनी महायुतीला अंगावर घेत पुन्हा एकदा आपला वरचष्मा सिद्ध केला. जिल्हा परिषदेच्या ७ जागांवर आणि त्यातील १४ गणांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
तर चिकूर्डे गटातून उद्धवसेनेच्या अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीच्या साथीने आपला गड राखला आहे. तर येलूर, कामेरीतून भाजपने आघाडी घेतली असून वाळव्यात शिंदेंसेना आणि बागणी गटात रयत क्रांतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
येथील शासकीय धान्य गोदामात वाळवा तालुक्यात मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार आहेत.एकूण २२ टेबलवर मोजणी सुरू आहे.गेल्यावेळी आमदार जयंत पाटील गटाची सदस्य संख्या वाढणार आहे. महाडीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ गटात आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोरगाव गटात जयंत पाटील यांनी दोन्हीकडे हादरे दिले आहेत. तसेच पंचायत समितीवरील आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे.
वाळवा आणि बावची या दोन गटात शिंदेंसेनेच्या गौरव नायकवडी यांनी आपला करिष्मा दाखवला आहे. दोन्ही ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बागणी गटात आमदार सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत या आघाडीवर आहेत.