Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 17:38 IST2026-02-09T17:35:29+5:302026-02-09T17:38:02+5:30
एकही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेसला प्रत्येकी दोन पंचायत समित्यांची सत्ता

Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ गटांपैकी १६ गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजय झाले असून, जिल्हा परिषदेतील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष असून, त्यांचे १५ उमेदवार विजय झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. दहा पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी दोन पंचायत समितींची सत्ता मिळाली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात १५ जागा मिळवून जिल्हा परिषदेतील दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. शिंदेसेनेने खानापूर, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांत उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे पलूस, कडेगाव, मिरज आणि तासगाव तालुक्यातून ११ उमेदवार विजय झाले आहेत. कडेगाव, पलूसमध्ये पक्षाला मोठे यश मिळाले आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला शिराळा तालुक्यात तीन, मिरज दोन, तासगाव दोन जागा, तर आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उद्धवसेनेनेही खाते खोललेले असून, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून अभिजित पाटील विजयी झाले आहेत. जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांपैकी भाजपा : जत, मिरज, राष्ट्रवादी (शरद पवार) : वाळवा, कवठेमहांकाळ, राष्ट्रवादी (अजित पवार) : शिराळा, तासगाव.
काँग्रेस : पलूस, कडेगाव, शिंदेसेना : खानापूर, आटपाडी पंचायत समित्यांची सत्ता मिळाली आहे. भाजपला मिरज पंचायत समितीत काटवरचे बहुमत असून, ते मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेवर येऊ शकतील.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
- भाजप - १६
- शिवसेना (शिंदे) -०७
- उद्धवसेना - ०१
- राष्ट्रवादी (अजित पवार) - ०९
- काँग्रेस - ११
- राष्ट्रवादी (शरद पवार) - १५
- जनसुराज्य - १
- रयत क्रांती - १
पंचायत समित्यांचे बलाबल
- भाजपा : जत, मिरज
- राष्ट्रवादी (शरद पवार ) : वाळवा, कवठेमहांकाळ
- राष्ट्रवादी (अजित पवार ) : शिराळा, तासगाव.
- काँग्रेस : पलूस, कडेगाव
- शिंदेसेना : खानापूर, आटपाडी