Sangli ZP Election 2026: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:12 IST2026-02-12T18:11:25+5:302026-02-12T18:12:14+5:30
काँग्रेसची जबाबदारी वाढविणारा निकाल

Sangli ZP Election 2026: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ
प्रताप महाडिक
कडेगाव : कडेगाव तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवली आहे. चारपैकी चार जिल्हा परिषद गट आणि आठपैकी सात पंचायत समिती गण काँग्रेसच्या पारड्यात पडले असून, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम यांच्या साथीने काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा निकाल भाजपसाठी आत्मपरीक्षण करण्यास भाग पडणारा आहे.
गत निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपने कडेगावमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे होते. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सत्ता मिळवली होती. मात्र, यानंतर साडेतीन वर्षांचा प्रशासक काळ आला आणि संपर्क कमी झाला. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेसने सत्ता खेचून आणली.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कडेपूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या विद्या कुंभार यांनी विजय मिळविला. या बालेकिल्ल्यातील हिंगणगाव बुद्रूक गणातून डॉ. जितेश कदम यांनी विजय मिळवला, तर सोनहिरा खोऱ्यातील चिंचणी गणातून दिग्विजय कदम यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवले. हे दोघेही माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू असून, कदम कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. दोघांची पंचायत समितीत एन्ट्री होत असून, युवा पिढीमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.
वाचा: सांगली जिल्हा नियोजनच्या ७५१ कोटींच्या आराखड्यास मान्यता; वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी ‘ए-आय’ अलार्म
राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर काँग्रेसने बाजी मारणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. भाजपच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सभा झाली. मात्र, भाजपची पकड सैल झाली आणि पराभव झाला, अशी चर्चा आहे.
काँग्रेसची जबाबदारी वाढविणारा निकाल
कडेगावचा निकाल काँग्रेससाठी विजयाचा आनंद असला, तरी तो जबाबदारीही वाढवणारा आहे. तर भाजपसाठी हा पराभव इशारा आहे. स्थानिक राजकारणात सातत्यपूर्ण कामगिरीच निर्णायक ठरते, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.