अलमट्टी धरणामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना बसतो पुराचा फटका; ६ एप्रिलपासून ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:15 IST2026-03-26T18:14:34+5:302026-03-26T18:15:42+5:30
जलप्रदूषण, नदी संवर्धन आणि पूर व्यवस्थापन यावर जनजागृती केली जाणार

अलमट्टी धरणामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना बसतो पुराचा फटका; ६ एप्रिलपासून ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार
सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे २००५ पासून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापन, आपत्तीपूर्व तयारी आणि शासनाकडे प्रभावी उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अभिषेक दिवाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वाळवा तालुक्यातील तांबवे येथून ६ एप्रिलपासून कृष्णा नदी संवर्धनासाठी ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. दिवाण म्हणाले, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे आयोजित या यात्रेत नदीकाठच्या गावांमध्ये थेट संवाद साधत जलप्रदूषण, नदी संवर्धन आणि पूर व्यवस्थापन यावर जनजागृती केली जाणार आहे. ६ एप्रिल रोजी वाळवा तालुक्यातील तांबवे येथून यात्रेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते होणार आहे. कोळे, नरसिंहपूर, बहे, खरातवाडी, विदूत, बोरगाव, ताकारी, तुपारी, दुद्योडी या मार्गावरून यात्रा पुढे जाईल.
७ एप्रिल रोजी पुणदीपासून वाळवा, नागराळे, नागठाणे, राडेवाडी, बुर्ली, अमनापूर, अंकलखोप, औदुंबर असा मार्ग असेल. ८ एप्रिल रोजी भिलवडी, माळवाडी, योगेवाडी, सुखवाडी, ब्रह्मानाळ, डिग्रज, नावरसवाडी, पदमाळे, सांगली, हरिपूर येथे मुक्काम होईल. तर ९ एप्रिल रोजी हरिपूरहून अंकली, इनाम धामणे, निलजी, बामणी, ढवळी, विजयनगर, मिरज, वड्डी, म्हैशाळ मार्गे राजापूर येथे सायंकाळी ४ वाजता सांगता समारंभ होणार असून, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या यात्रेदरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठका घेऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.