Sangli: कुची येथील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा गंडा, आंध्र प्रदेशातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:02 IST2026-02-20T14:01:36+5:302026-02-20T14:02:26+5:30
पोलिस आंध्रात रवाना होणार

Sangli: कुची येथील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा गंडा, आंध्र प्रदेशातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
कवठेमहांकाळ : तालुक्यातील कुची येथील तीन शेतकऱ्यांकडून द्राक्ष माल खरेदी करून एक महिन्यात पैसे देतो, असे सांगून आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कृष्णदेव पंडित डुबोले (वय ४९, रा. कुची) या शेतकऱ्याने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम, सिरगम मुरली कृष्णा (रा. रावलपालम) या आंध्रातील तीन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम व त्याचे वडील सिरगम मुरली कृष्णा यांची आंध्र प्रदेशात रावलपालम येथे साई फ्रूट कंपनी आहे. फिर्यादी कृष्णदेव पंडित डुबोले यांच्याशी २०२२ मध्ये ओळख झाली. डुबोले यांच्या शेतात ९,२६,५११ रुपये किमतीचा २१ टन ५८४ किलो द्राक्षमालाच्या ६,५६४ पेट्या व तात्यासाहेब राजाराम पाटील (रा. कुची) यांच्या शेतातील १,९९,३२० रुपये किमतीचा ४ टन ९८० किलो मालाच्या १,२४५ पेट्या, तसेच मुरारराव ज्ञानदेव पाटील (रा. कुची) यांच्या शेतातील ३,२३,४०० रुपये किमतीचा ९ टन २४० किलो द्राक्षमालाच्या २,३१० पेटी, असा माल त्यांनी खरेदी केला.
फिर्यादी डुबोले व दोन शेतकऱ्यांना द्राक्षमालाचे एकूण १४,४९,२३१ रुपये एका महिन्यानंतर देतो, असे सांंगितले. फिर्यादी व दोन शेतकऱ्यांनी द्राक्षमालाचे पैसे परत मिळण्यासाठी आजपर्यंत वारंवर पाठपुरावा केला; परंतु मालाची रक्कम न मिळाल्याने तिघांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डुबोले यांनी तिघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिस तपास करीत आहेत.
पोलिस आंध्रात रवाना होणार
दरवर्षी द्राक्ष बागायतदारांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येतात. यंदाही हंगाम सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिस लवकरच आंध्र प्रदेशकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.