सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा - चव्हाण; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:02 IST2025-08-14T19:01:09+5:302025-08-14T19:02:21+5:30
सांगलीच्या विकासासाठीच भाजपमध्ये : पृथ्वीराज पाटील

सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा - चव्हाण; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला पाठबळ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत व्यक्त केला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपत प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करीत आले आहेत. सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे.
यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते. पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.
सांगलीच्या विकासासाठीच भाजपमध्ये : पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषविली. मीदेखील अनेक वर्षे विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतोय. दोन विधानसभा निवडणुका एक व्हिजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसूत्री मी तयार केली होती. ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपत येत असल्याचे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.