Sangli-Local Body Election: विट्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मालमत्ता किती, सर्वात श्रीमंत कोण... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:58 IST2025-12-05T18:57:53+5:302025-12-05T18:58:23+5:30
भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी तिरंगी लढत झाली

Sangli-Local Body Election: विट्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मालमत्ता किती, सर्वात श्रीमंत कोण... जाणून घ्या
दिलीप मोहिते
विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी दीपक जंगम या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या असून त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थावर आणि जंगम अशी २ कोटी ९४ लाख ८८ हजार ७०८ रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यापाठोपाठ शिंदेसेनेच्या उमेदवार काजल संजय म्हेत्रे यांच्या कुटुंबीयांकडे १ कोटी २ लाख ८० हजार ११० रुपयांची तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा अविनाश चोथे यांच्या कुटुंबाकडे ९५ लाख १५ हजार ८४७ रुपयांची मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्ष अशी तिरंगी झाली. या तीनही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
भाजपच्या ५५ वर्षीय उमेदवार प्रतिभा अविनाश चोथे या पदवीधर असून त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार आहे. स्वत: त्यांच्याकडे ३१ लाख ५२ हजाराचे तर पती अविनाश यांच्याकडे ४ लाख ८० हजाराचे सोने-चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे ५४ लाख ६७ हजारांची जंगम आणि ४० लाख ४८ हजार ५०० रुपयांची स्थावर अशी ९५ लाख १५ हजार ८४७ रुपयांची मालमत्ता आहे. तर विविध प्रकारची कर्जे व देणी ११ लाख ४२ हजार इतकी आहेत.
शिंदेसेनेच्या उमेदवार काजल संजय म्हेत्रे यांचे वय ५४ वर्षे असून त्यांचे शिक्षण इ. १० वी पास झाले आहे. स्वत: त्यांच्याकडे १८ लाख १८ हजारांचे तर पती संजय यांच्याकडे ६ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत. म्हेत्रे कुटुंबाची जंगम मालमत्ता ६० लाख ८० हजार ११० तर स्थावर मालमत्ता १ कोटी २ लाख रूपये अशी एकूण १ कोटी ६२ लाख ८० हजार ११० इतकी आहे. तसेच कर्जे व विविध प्रकारची देणी २ लाख ८६ हजार रुपये आहे.
असे आहेत लखपती उमेदवार
निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाच्या रोहिणी जंगम यांनी निवडणूक लढविली. त्यांचे वय ३२ वर्षे असून त्या पदवीधर आहेत. जंगम पती-पत्नीकडे १७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे जंगम मालमत्ता ६४ लाख ८८ हजार ७०८ तर स्थावर मालमत्ता २ कोटी ३० लाख अशी एकूण २ कोटी ९४ लाख ८८ हजार ७०८ रुपयांची मालमत्ता जंगम कुटुंबाकडे आहे. तर विविध प्रकारची देणी ३८ लाख रुपये आहे. त्यामुळे विटा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी जंगम यांचा मालमत्तेत पहिला, काजल म्हेत्रे यांचा दुसरा आणि प्रतिभा चोथे यांचा तिसरा क्रमांक लागतो.