कडेगाव : टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखेर सुरू झाले असून यामुळे कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य कालव्याद्वारे योजनेचे पाणी लवकरच शिवाजीनगर तलावात पोहोचणार आहे. यापुढे मुख्य कालव्यातून हिंगणगाव बुद्रुक तलावात व पुढे खानापूर, आटपाडी आणि सांगोलापर्यंत जाणार आहे.यामुळे ५५,००० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. शेतकऱ्यांनी लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर सरकारकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठे नुकसान होऊ लागले होते. रब्बी पिके कोमेजून जात होती, तर ऊस व बागायती पिकांसमोरील संकट वाढले होते. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून योजनेच्या अधिकाऱ्यांनी आवर्तन सुरू केले आहे.
योजनेचा टप्पा क्रमांक १अ मधून कृष्णा नदीचे पाणी सोडले गेले आणि ते टप्पा क्रमांक १ ब मध्ये पोहोचवून खड्या उंचीवरून (६१ मीटर) पाणी उचलून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी १९५० अश्वशक्तीचे ३३ पंप बसवले गेले आहेत. त्यातील काही पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर हे पाणी ८५ मीटर उचलून ६ महाकाय पाइपलाइनद्वारे खांबाळे बोगद्याच्या सुरुवातीस पोहोचवले आहे.
खांबाळे बोगद्याच्या माध्यमातून मुख्य कालव्यात प्रवेश करत, पाणी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर तलावात सोडण्यात येत आहे. दरम्यान, योजनेच्या पाण्याचा वितरण कार्यक्रम वेगाने सुरू असून, सुर्ली व कामथी कालव्यात पाणी लवकरच जाणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी या योजनेचे आवर्तन सुरू करणे महत्त्वाचे ठरले आहे.