पलूस नगरपालिकेत अखेर महिलाराज; काँग्रेस-भाजपातच खरी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:22 IST2025-10-07T19:21:28+5:302025-10-07T19:22:18+5:30
अनेक पुरुषांचे पत्ते कट; आता कोणाला लाॅटरी लागणार? : राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार

पलूस नगरपालिकेत अखेर महिलाराज; काँग्रेस-भाजपातच खरी लढत
नितीन पाटील
पलूस : पलूस नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यासाठी अनेक पुरुषांनी देव पाण्यात घातले होते पण अनेकांचा पत्ता कट होऊन आता नगरपालिकेत महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील दिग्गज खुल्या व ओबीसी प्रवर्गातील पुरुषांच्या स्वप्नावर या आरक्षणाने पाणी फिरले आहे. आता तिकीट मिळून नगराध्यक्ष पदाची ही लाॅटरी कोणाला लागणार याकडे नजरा लागल्या आहेत. सोमवारी मुंबई मंत्रालयात जाहीर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत पलूस नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिला पडल्याने अनेक मातब्बर इच्छुकांच्या राजकीय तयारीवर पाणी फिरले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत इतर मागासवर्गीय पुरुष आरक्षण पडले होते. यावेळी मात्र खुले किंवा ओबीसी पुरुष आरक्षण पडेल म्हणून अनेकांनी संघटनात्मक हालचालींना गती देत सार्वजनिक कार्यक्रम, सभा, समारंभ, मेळावे घेत कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला होता. मात्र आता खुल्या महिला प्रवर्गाच्या घोषणेमुळे अनेकांना याचा जणू सुखद धक्काच बसला आहे.
महिला आरक्षणामुळे राजकारणात आता अनेक नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. यासाठी अनेकांनी पत्नीसाठी हे पद मिळावे यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होईल. या पदासाठी अनेक माजी नगरसेवक व उदयोन्मुख महिला नवे चेहरे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधलेल्या अनेकांचा पत्ता कट झाल्याने काही इच्छुकांनी आता किमान नगरसेवकपद मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक पक्षांनी काँग्रेसला शह देण्यासाठी यापूर्वीच बैठकांचे सत्र सुरू ठेवले होते. याला कितपत यश येते हेही पहावे लागणार आहे. पलूसच्या महिलाराजच्या दावेदारची लाॅटरी कोणाला लागणार यासाठी पलूसकरांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
मोजकेचे चेहरे सक्रिय काही पडद्यामागे
पलूस नगराध्यक्ष पदासाठी महिलांच्यात मोठा जनसंपर्क असलेला व मतदारांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा सर्वच पक्षांकडे नाही. त्यामुळे सर्वच पक्षांना नवा चेहरा शोधावा लागणार आहे. ठाम व ठोस असा चेहरा सध्या तरी कोणत्याच पक्षाकडे आजमितीला नाही.