नशेत असाल तर मोटार सुरूच होणार नाही, सांगलीतील दहावीतल्या प्रेमने बनवली अपघात रोखणारी यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:57 IST2025-07-15T17:57:49+5:302025-07-15T17:57:49+5:30
कॉपीराईटसाठी प्रयत्न

नशेत असाल तर मोटार सुरूच होणार नाही, सांगलीतील दहावीतल्या प्रेमने बनवली अपघात रोखणारी यंत्रणा
सांगली : नशेत वाहन चालविल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला. तेव्हा त्याला ‘आयडिया’ सुचली. दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली. मोटारचालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तत्काळ मालकाला मोबाइलवर ‘व्हॉईस कॉल’ जाईल. ‘आपके कार का चालक नशेमे है’ असे ऐकवून ‘लोकेशन’देखील पाठवले जाईल. तसेच इकडे मोटारीचे इंजिनदेखील बंद पडेल, अशी सिस्टीम दहावीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवली आहे.
प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने सुरक्षितपणे फटाके फोडता येतात हे पाहून स्वत:च रिमोट कंट्रोल बनवला. सतत वेगवेगळ्या कल्पना डोक्यात भिरभिरत असतानाच एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालविल्यामुळे ते झाडावर आदळलेला अपघात पाहिला. तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे? असे विचारचक्र सुरू झाले. चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही, अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न करू लागला.
जवळपास दीड वर्षानंतर प्रेम याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली. त्याच्या सिस्टीममधील सेन्सरमुळे चालकाने नशेत असताना जर मोटार सुरू केली तर तत्काळ मालकाच्या मोबाइलवर एक व्हॉईस कॉल जातो. गाडीचा क्रमांक, इंजिन, चेस नंबर, लोकेशन आदी माहितीबरोबर तुमच्या गाडीचा चालक नशेत असल्याचे कॉलवरून ऐकवले जाते. तसेच इकडे गाडीचे इंजिनदेखील बंद होते. त्यामुळे गाडीचा मालक तत्काळ चालकाला कॉल करून तू दारू पिला असल्याचे सांगून उतरायला भाग पाडू शकतो. प्रेमचे वडील नवनाथ पसारे यांचा चहाचा स्टॉल आहे. त्यांनी आणि सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी प्रेमला प्रेरणा दिली.
कॉपीराईटसाठी प्रयत्न
प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे पंधरा हजारांपर्यंत खर्च येतो. तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाइलवर ॲप आवश्यक असते. परंतु त्यामुळे अपघात टळून लाखमोलाचा जीव वाचू शकतो. या सिस्टीमच्या कॉपीराईटसाठी वडिलांनी प्रस्ताव पाठवला आहे.