कृष्णेच्या सत्ताकारणात सभासदांच्या बेरजेचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:06+5:302021-04-11T04:25:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्ण साखर कारखान्याच्या सत्ताकारणात सभासद वाढवणे तसेच कमी करणे, यावर प्रत्येक निवडणुकीत भर असतो. ...

The politics of the sum of the members in Krishna's power | कृष्णेच्या सत्ताकारणात सभासदांच्या बेरजेचे राजकारण

कृष्णेच्या सत्ताकारणात सभासदांच्या बेरजेचे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्ण साखर कारखान्याच्या सत्ताकारणात सभासद वाढवणे तसेच कमी करणे, यावर प्रत्येक निवडणुकीत भर असतो. सत्ता मिळली की सोयीप्रमाणे सभासद यादीला अंतिम स्वरूप द्यायचे, हे राजकारण ठरलेले आहे. सभासद संख्येवरून निवडणुकीपूर्वीच राजकारण रंगते. आताही या मुद्द्यावरून तिन्ही गटांनी धुरळा उठविला आहे.

‘कृष्णे’च्या निवडणुकीत सहा गटांतील काही गावे नेहमीच रडारवर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्टपर्यंत पुढे गेल्या आहेत. परंतु संस्थापक पॅनेलने ठरल्याप्रमाणे कृष्णेच्या निवडणुका घ्याव्यात यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणूक निश्चित मानून तिन्ही गट तयारीला लागले आहेत. कारखाना प्रशासनाने सभासदांच्या याद्या साखर आयुक्तांना सादर केल्याचे सांगितले जात आहे. यावर आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सभासदाची यादी अंतिम होईपर्यत अडथळे येणार आहेत.

निवडणूक सहा गटात हाेते. प्रत्येक गटात सरासरी सात हजार सभासद आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (२२६७), नेर्ले (१३८९), काले (१२९१), कार्वे (११९७), तांबवे (११६८), वडगाव हवेली (११४७), अटके (१०७५), रेठरे हरणाक्ष (१०१६) ही गावे तिन्ही पॅनेल प्रमुखांच्या रडारवर असतात. त्यामुळे या गावांतील सभासदांची यादी अंतिम केव्हा होते यावर सभासद लक्ष ठेवून आहेत. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच सहकार, संस्थापक आणि रयत पॅनेलचे नेते या गावांत संपर्क ठेवून आहेत.

कोट

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. परंतु, आम्ही निवडणूक ठरल्याप्रमाणे व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होतील. याद्याही अंतिम झाल्या आहेत, आम्ही निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत आहोत.

- अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना

Web Title: The politics of the sum of the members in Krishna's power