पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:22 IST2025-07-22T19:21:40+5:302025-07-22T19:22:08+5:30

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता

Police should investigate Padalkar brothers calls, Shinde Sena demands from Chief Minister | पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आटपाडी : करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठले आहे. संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी शिंदेसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत गंभीर व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. 

पीडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची त्यांनी मागणी केली. त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी या घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावेत, अशी मागणीही केली होती. अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनच भूमिका होती व आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय? ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृहविभागाने व पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स काढावेत.

यावेळी अरविंद चव्हाण, विजय सरगर, रामदास सूर्यवंशी, विजय देवकर, दिनकर पाटील, नंदकुमार कदम, अभिजीत देशमुख, संजय यमगर, किसन कटरे, जयप्रकाश चव्हाण, मंगेश सस्ते, मनोहर नांगरे, गोरख बाबर, फत्तेसिंह देशमुख, आप्पासाहेब पाटील, संदीप मंडले, अनिरुद्ध देशमुख, मनोज देशपांडे, आबासाहेब ऐवळे, सचिन सावंत, मारुती ढोबळे, अनिल मुढे उपस्थित होते.

Web Title: Police should investigate Padalkar brothers calls, Shinde Sena demands from Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.