कोयनेतून १० हजारांवर तर वारणेतून साडेचार हजार क्युसेक विसर्ग; कृष्णा, वारणा नद्यांची पातळी स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:34 IST2025-08-25T16:33:47+5:302025-08-25T16:34:16+5:30
धरण भरण्यास केवळ ४ टक्केच साठ्याची गरज

कोयनेतून १० हजारांवर तर वारणेतून साडेचार हजार क्युसेक विसर्ग; कृष्णा, वारणा नद्यांची पातळी स्थिर
सांगली : पाऊस बंद झाला असला तरी अलमट्टी धरणात १००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ९५.५७ टक्के धरण भरले आहे. म्हणून कोयना धरणातून रविवारी सकाळपासून १० हजार ४०० क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. तसेच वारणा धरणातही ३२.४९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ९४ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे धरणातून चार हजार ७३६ क्युसेक विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग चालू असला तरी कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे.
मागील आठवड्यात धरण क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. धरणे तुडुंब भरली असून, ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. कृष्णा, वारणा नद्यांनाही पूर आला होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे महापुरापासून बचाव झाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसीची असून, सध्या १००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणात ९५.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या १२ हजार ४३९ क्युसेकने पाण्याची आवक असून, एवढ्यावर धरण १०० टक्के भरू शकते. म्हणूनच सध्या धरणातून रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून १० हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग सुरू असला तरी कृष्णा नदीला पूर येणार नाही. नदीची पाणीपातळी २० फुटाला स्थिर राहू शकते.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजलेपासून विसर्ग चालू केला आहे. वक्र द्वाराद्वारे तीन हजार १०६ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे व विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग कायम ठेवून एकूण चार हजार ७३६ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे.
चौकट
अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेकने विसर्ग
अलमट्टी धरणामध्ये सध्या १०३.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये दोन लाख ७३ हजार ३४० क्युसेकने आवक चालू आहे. म्हणूनच धरणातून एक लाख ७५ हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी
ठिकाण - पाणीपातळी फुटात
- कृष्णा पूल कराड - ९.८
- बहे पूल - ६.६
- ताकारी पूल - १६.१०
- भिलवडी पूल - २०
- आयर्विन पूल - २२.९
- राजापूर बंधारा - ४६.६
धरणातून विसर्ग
धरण - पाणीसाठा / टक्केवारी / विसर्ग क्युसेक
- कोयना - १००.६० / ९६ / १०४००
- वारणा - ३२.१९ / ९४ / ४७३६
- अलमट्टी - १०४ / ८५ / १७५०००
- धोम - १३.२३ / ९८ / १४२८
- कण्हेर - ९.८५ / ९८ / १८९६