Sangli: भरधाव टँकरने तिघांना उडविले; एक जण जागीच ठार, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 14:24 IST2024-06-18T14:18:47+5:302024-06-18T14:24:25+5:30
ग्रामस्थांनी टँकरचा पाठलाग करत चालकास पकडून जत पोलिसांच्या ताब्यात दिले

Sangli: भरधाव टँकरने तिघांना उडविले; एक जण जागीच ठार, दोघे जखमी
जत : विजापूर - गुहागर मार्गावरील जत तालुक्यातील धावडवाडी बसस्थानक येथे भरधाव टँकरच्या धडकेत एकजण ठार तर दोघे जखमी झाले. टँकरने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या एकास उडवून पुढे दुचाकीस्वारास धडक दिली. यात अहमदअली बाबासो शेख (वय ५६, रा. धावडवाडी, सध्या रा. मुंबई) जागीच ठार झाले. तर मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली.
मृत अहमदअली शेख हा मुंबई येथे बेस्ट बसमध्ये नोकरीस होता. बकरी ईद सणामुळे तो गावी आला होता. आज सकाळी धावडवाडी येथे लागून असलेल्या बस स्टॉप लगत ते उभे होते. नागज कडून येणाऱ्या भरधाव रिकाम्या दुधाच्या टँकरने त्यांना उडविले. यात अहमदअली जागीच ठार झाले.
तरपुढे दोन मोटरसायकलस्वारासह दिलेल्या धडकेत दुर्योधन तानाजी कोळेकर (२१), किरण मनोहर सुर्यवंशी (२२ दोघे रा. धावडवाडी, ता. जत) हे जखमी झाले. मयत अहमदअली याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. गावातील लोकांनी टँकरचा पाठलाग करत चालकास वायफळ येथे पकडले आणि जत पोलिसांच्या ताब्यात दिले.