Sangli: योगेवाडीजवळ बस-कंटेनरची भीषण धडक, नऊ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:07 IST2025-08-19T12:06:35+5:302025-08-19T12:07:02+5:30
गणपतीपुळेला जाताना घटना

Sangli: योगेवाडीजवळ बस-कंटेनरची भीषण धडक, नऊ जण जखमी
तासगाव : गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदयात्रेला आज, मंगळवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. तासगाव तालुक्यातील योगेवाडी फाट्याजवळ कंटेनर, एसटी बसचा भीषण अपघात झाला. या धडकेत बसचालकासह नऊ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघात गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी क्षणभरातच भीषण ओरड, धावपळ आणि रक्तबंबाळ दृश्य निर्माण झाले. काही काळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
जखमींमध्ये बसचालक गोरख तुकाराम पाटील (वय-४५) यांच्यासह मालन दत्तात्रय पाटील (७०), काजल विशाल पाटील (३०), रुक्मिणी भीमराव पवार (५५), कमल वसंत पवार (६०), सुलाबाई गणपतराव पाटील (६०), रंजना दिलीप पाटील (४५), आदिरा विशाल पाटील (७) व शालन वसंत पाटील (५५) या प्रवाशांचा समावेश आहे.
घटनास्थळी योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी, मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.