सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:22 IST2025-12-24T12:22:36+5:302025-12-24T12:22:59+5:30
काय आहे म्युल अकाउंट?, ३४ डेबिट कार्ड, २७ सिमसह संशयित अटकेत

सायबर चोरट्याचे नवे जाळे; सांगलीत म्युल अकाउंटमधून सायबर लूट, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली : जिल्ह्यातील ३७ ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी जैब जावेद शेख (वय २२, रा. मिरा हौसिंग सोसायटी, ओंकार अपार्टमेंट, प्लॅट क्र. ६, टिंबर एरिया, सांगली) याला अटक केली आहे.
आरोपीकडून ३४ डेबिट कार्ड, २७ मोबाइल सिमकार्ड, ६ मोबाइल फोन, तसेच चारचाकी वाहन, असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सायबर लूट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. म्युल अकाउंटचा वापर करून फसवणुकीचा नवा प्रकारच समोर आला आहे. यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती भाड्याने घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम वर्ग करतात. जिल्ह्यात अशा प्रकारे बँक खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. तपासात संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या चारचाकी वाहनातून ३४ डेबिट कार्ड, २७ सिमकार्ड, चार लाख रुपये किमतीचे ६ मोबाइल आढळून आले. पोलिसांनी वाहनासह ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे, तसेच पोलिस कर्मचारी करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, विवेक साळुंखे, अभिजित पाटील, इम्रान महालकरी अजय पाटील, अजय बेंदरे, दीपाली नेटके, शांतव्वा कोळी, गणेश नरळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.
काय आहे म्युल अकाउंट?
मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, ‘म्युल अकाउंट’ हा नवा प्रकार समोर आला आहे. यामध्ये विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीसाठी भाड्याने घेवून त्याबदल्यात खातेदारांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाते. या खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांत वर्ग केले जातात, रोख स्वरूपात काढले जातात किंवा क्रिप्टो करन्सीत रूपांतरित केले जातात.