सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:16 IST2026-03-03T18:16:21+5:302026-03-03T18:16:48+5:30

‘पालकमंत्री काहीही म्हणतो, व्हीप आमचाच’

NCP's B plan ready for support in Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

सांगली : जिल्हा परिषदेतील पाठिंब्याबाबत पहिल्या टप्प्यात मतभेदांचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार)मध्ये आता एकमत होत असताना दिसत आहे. शनिवारी पक्षनेत्यांच्या मिरजेत झालेल्या बैठकीत पाठिंब्याविषयी एकमत झाले. भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघाडीशी सूत जमविण्याचा सूर बहुतांश नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

मिरजेत शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय पाटील, आदी उपस्थित होते.

पाठिंब्याबाबत भाजप दुसऱ्या पसंतीचा पक्ष असल्याचे संकेत नेत्यांनी दिले. अर्थात, पक्षाने पाठिंब्याविषयी `बी` प्लॅनदेखील तयार केला आहे. मुंबईतील वरिष्ठांकडून भाजपलाच पाठिंब्याचे आदेश आले, तर दोन सदस्य आदेश झुगारून लावतील. व्हीपचे पालन केले नाही म्हणून ते अपात्र ठरतील.

त्यामुळे यदाकदाचित या दोन सदस्यांच्या अपात्रतेमुळे पुन्हा निवडणुका लागल्या, तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील, संजय पाटील व अजितराव घोरपडे हे वरिष्ठ नेते घेतील. याकामी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनीही ताकद देण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात आले. हे दोन सदस्य तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी भागातील असतील.

जिल्हा परिषदेचा पॅटर्न पंचायत समितीतही

जिल्हा परिषदेत पक्षाकडून पाठिंब्याविषयी जो निर्णय होईल, तोच निर्णय पंचायत समित्यांनाही लागू असेल असे नेत्यांच्या बैठकीत ठरले. जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी(अजित पवार)च्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. तेथेही सव्वावर्षे सभापतिपदाची अट ठेवली जाऊ शकते. काठावर बहुमत असलेल्या पंचायत समित्यांत यानिमित्ताने अजित पवार गटाला सत्तेची लॉटरी लागली आहे.

... व्हीप आमचाच असेल

पालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी(अजित पवार) व्हीपचा इशारा दिला आहे. त्यावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बैठकीत ठाम भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. ‘पालकमंत्री काहीही म्हणाले तरी व्हीप आमच्याच पक्षाचा असेल’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पाठिंब्याबाबत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनमानसाच्या भूमिकेचा आम्हाला आदर केला पाहिजे. राजकारणात सातत्याने आम्हाला त्रास दिलेल्या तसेच ऐन निवडणुकीतही हैराण केलेल्या नेत्यांच्या पक्षाला पाठिंबा कसा द्यायचा ? असा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचाही सूर आहे. कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार करूनच पाठिंब्याविषयी पक्षामध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती मुंबईतील वरिष्ठांना एक-दोन दिवसांत देणार आहोत. त्यानंतर जिल्हास्तरावर निर्णय जाहीर केला जाईल. मात्र, सव्वा वर्षे अध्यक्षपदाची आमची अपेक्षा कायम आहे. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री, नेते राष्ट्रवादी (अजित पवार)

Web Title : सांगली जिला परिषद में समर्थन के लिए NCP की 'बी' योजना तैयार

Web Summary : सांगली जिला परिषद में NCP (अजित पवार गुट) महा विकास अघाड़ी के पक्ष में है। बीजेपी को समर्थन देने के लिए संभावित आलाकमान के आदेशों के लिए एक 'बी' योजना है। पार्टी आदेशों का उल्लंघन करने पर अयोग्य ठहराए गए सदस्यों का समर्थन करेगी, जिससे स्थानीय राजनीति में निरंतर प्रभाव सुनिश्चित होगा।

Web Title : NCP's 'B' Plan Ready for Support in Sangli Zilla Parishad

Web Summary : NCP (Ajit Pawar group) favors Maha Vikas Aghadi in Sangli Zilla Parishad. A 'B' plan addresses potential high command orders to support BJP. The party will support members facing disqualification for defying orders, ensuring continued influence in local politics.