Sangli ZP: व्हीप पाळला नाही तर राष्ट्रवादीचे सदस्य अपात्र ठरतील, चंद्रकांत पाटील यांचा गर्भित इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:30 IST2026-02-17T14:29:25+5:302026-02-17T14:30:11+5:30
मुख्यमंत्री हे चांगले लोहचुंबक, जिल्हा परिषदेत सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष

संग्रहित छाया
सांगली : महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सदस्य पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना पक्षाचा व्हिप मानावाच लागेल. अन्यथा ते अपात्र ठरतील, असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल आणि सव्वा वर्षांचा एक याप्रमाणे चार अध्यक्ष होतील, असा दावाही त्यांनी केला.
ते सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माजी खासदार संजय पाटील यांनी पाठिंब्याबाबत एकमत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्यास अपात्रतेची कारवाई होईल. अपात्रतेचा कायदा कठोर आहे. त्यावर निर्णयासाठी कोणत्याही न्यायालयात जावे लागत नाही. निवडणूक प्रमुख जागेवरच अपात्रतेचा निर्णय देऊ शकतो. सभागृहात व्हिपनुसार हात वर केला नाही, तर तो सदस्य जागेवरच अपात्र ठरतो. त्यामुळे विरोधात जाण्याचे धाडस कोणीही करणार नाही.
ते म्हणाले, भाजप, शिंदेसेना किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात एकत्र येण्याविषयी काही अडचण असेल, असे वाटत नाही. जिल्हा परिषदेतील बलाबल निश्चित झाले आहे. महायुतीचे संख्याबळ ३१ आहे. विकास आघाडीचे ३० होते. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष होईल. युतीमध्ये पहिला अध्यक्ष कोणाचा होईल हे आपसात बोलून ठरविण्याचे काम सुरू आहे. सव्वा वर्षांचे चार जिल्हाध्यक्ष करू. त्यामध्ये कोणाला आज मिळेल, तर कोणाला उद्या मिळेल.
पहिला संधी कोणाला? यात एकवाक्यता व्हावी लागेल. उपाध्यक्ष कोण, सभापतीपदे कोणाला? ही पुढील प्रक्रिया सोपी आहे. आमचे १८ सदस्य असल्याने पहिल्या वर्षी आमचाच अध्यक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पहिले वर्षे आम्हाला अध्यक्षपद मिळावे. अतिशय चांगले यश मिळविलेल्या आमदार सुहास बाबर यांनीही पहिल्या वर्षी अध्यक्षपद मागितले आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. अध्यक्षपदाविषयी एकत्र बसून मार्ग काढू.
मुख्यमंत्री हे चांगले लोहचुंबक
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री हा एक असा लोहचुंबक आहे की, तेथे गेल्यावर सारे त्यांचे म्हणणे मान्य करतात. तेदेखील योग्य मार्गदर्शन करतात. दोन गोष्टी तुम्ही मागे, तर दोन गोष्टी आम्ही पुढे असा मार्ग काढतात. मतभेद नाहीत असे नाही, ते आहेत; पण त्यातून मार्ग काढू.