Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:43 IST2025-08-27T19:34:59+5:302025-08-27T19:43:46+5:30

मिरजेत गुप्त बैठक, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा, राजकीय हालचालींचा रंगमंच तापला

MP Vishal Patil and MLA Dr Vishwajit Kadam are in the fray to revive the Congress and strengthen the organization | Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

शीतल पाटील 

सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम अजून औपचारिकरित्या वाजले नसले तरी राजकीय हालचालींचा रंगमंच तापला आहे. काँग्रेसच्या गोटातून बडे नेते भाजपच्या दिशेने झेपावत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सावरून संघटनेला बळ देण्यासाठी खासदार विशाल पाटील व आमदार डाॅ. विश्वजित कदम यांनी मैदानात उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच दोन्ही नेत्यांनी मिरजेत घेतलेली गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे देण्याची रणनिती सुरूच आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका क्षेत्रातील राजकीय गणिते बदलली आहेत. बडे नेते भाजपच्या गळाला लागत असताना काँग्रेसची नाव पैलतिरी लावण्याची जबाबदारी आमदार डाॅ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. दोन्ही नेते मैदानात उतरले असून, पक्षाला बळ देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी कदम - पाटील या दोन्ही नेत्यांनी मिरजेत बैठक घेतली. या बैठकीला मिरज अध्यक्ष संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मोजकीच नेतेमंडळी उपस्थित होती. बैठकीत मिरजेतील राजकीय समीकरणावर चर्चा झाली. राष्ट्रवादी व भाजपशी संबंधित काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिरजेतील राजकीय व जातनिहाय समीकरणावर भाजप व महायुतीसमोर तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मिरज शहरात सात प्रभाग आणि २७ नगरसेवक आहेत. सर्व सातही प्रभागात भाजप व काँग्रेसमधील संभाव्य उमेदवार, निवडून येण्यासाठी आवश्यक रसद यावर बैठकीत झाली आहे. भाजप महायुतीला मिरजेतून आव्हान उभे करण्याचा निर्धारही करण्यात आला. त्यामुळे मिरज शहरातील सात प्रभागातील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे.

नाराजांवर लक्ष

काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीवरून रस्सीखेच होणार आहे. भाजपमधील जुने व बाहेरून आलेल्या नव्या कार्यकर्त्यांतील संघर्षात काँग्रेसने नाराजांना गळाला लावण्याची तयारी चालविली आहे. काही माजी नगरसेवकांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यांना पक्षात घेऊन संघटना बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे.

Web Title: MP Vishal Patil and MLA Dr Vishwajit Kadam are in the fray to revive the Congress and strengthen the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.