Sangli: बिटकॉईनच्या आमिषाने आईचे गंठण गहाण ठेवले, फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:56 IST2025-09-27T18:56:13+5:302025-09-27T18:56:45+5:30
संशयितांनी पैसे गुंतवण्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले

Sangli: बिटकॉईनच्या आमिषाने आईचे गंठण गहाण ठेवले, फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवण्यास प्रवृत्त करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत नीलेश गणेश पाटील (वय २०, रा. खेराडकर गॅसजवळ, संजयनगर) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित मिहीर चंद (रा. पटेल आर्केड, आनंद नर्सिंग होमजवळ, मिरज), तन्वेश दीपक पवार (रा. रेणुका मंदिरजवळ, वानलेसवाडी), अमित सहानी, वासू मेहतर (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश पाटील हा सध्या शिक्षण घेतो. फेब्रुवारी महिन्यात त्याची संशयितांशी ओळख झाली. तेव्हा विश्रामबाग येथील एका कॅफेमध्ये बसल्यानंतर मिहीर चंद याने बिटकॉईनच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. नीलेशकडे पैसे नव्हते. त्यामुळे संशयितांनी त्याला पैसे गुंतवण्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले. नीलेशचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण आणून दिले.
मिहीर याने तन्वेश, अमित, वासू यांच्यामार्फत लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दागिना गहाण ठेवून दोन लाख रुपये घेतले. त्यापैकी ६३ हजार रुपये नीलेशला दिले. उर्वरित रक्कम त्याला दिली नाही. बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने संशयित चौघांनी फसवणूक केल्याचे नीलेशच्या लक्षात आले. त्याने वारंवार विचारणा करूनही नीलेशला पैसे दिले नाहीत की, पाच तोळ्याचे सोन्याचे गंथन परत केले नाही. संशयितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी नीलेशने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.