Sangli Politics: जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार–माजी खासदार पुन्हा आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:10 IST2026-01-12T18:10:20+5:302026-01-12T18:10:44+5:30
युती–आघाडीच्या घडामोडीकडे लक्ष

Sangli Politics: जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार–माजी खासदार पुन्हा आमने-सामने
दत्ता पाटील
तासगाव : नगरपालिकेच्या पटावर झालेल्या बहुरंगी लढतीत खरा सामना आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय (काका) पाटील असाच झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पटावरही दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. या पटावर भाजप, काँग्रेस, शिवसेना, तसेच तिसऱ्या आघाडीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तासगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर माजी खासदार संजय काका पाटील यांचे अस्तित्वही कसोटीवर होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काका गटाच्या स्वाभिमानी आघाडीने तासगावचा गड काबीज केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सलग दोन पराभवानंतर नगरपालिकेतील विजयाने काका गटाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काका गटाने जोमाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दुसरीकडे, तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गटांपैकी बहुतांश ठिकाणी आबा गटाचे परंपरागत वर्चस्व राहिलेले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आबा गटाला नेहमीच झुकते माप मिळाल्याचा इतिहास पाहायला मिळतो. त्यामुळे आमदार रोहित पाटील यांच्या शिलेदारांनी यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. परिणामी, नगरपालिकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आबा-काका गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
ग्रामीण भागात काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, मनसे आणि तिसऱ्या आघाडीचेही काही ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आबा–काका गटांबरोबरच अन्य पक्षांचा आणि तिसऱ्या आघाडीचा कलही निर्णायक ठरणार आहे.
मनोमिलनाची चर्चा पुन्हा ऐरणीवर
नगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आबा–काका गटात मनोमिलन होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात दोन्ही गट प्रत्यक्षात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. निकालानंतर दोन दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, तसेच दोन्ही गटांतील सर्व नव्या नगरसेवकांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. या फोटोमुळे पुन्हा एकदा मनोमिलनाच्या चर्चेला हवा मिळाली आहे.
युती–आघाडीच्या घडामोडीकडे लक्ष
तासगाव नगरपालिका निवडणुकीत प्रबळ सर्वच पक्षांनी युती–आघाडीला कोलदांडा घातला होता. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती आणि आघाडी होणार का? याबाबत उत्सुकता कायम आहे.