Sangli: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:18 IST2025-11-26T18:15:19+5:302025-11-26T18:18:04+5:30
Local Body Election: प्रभाग १ मध्ये समीकरणे बदलली

Sangli: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी
अशोक पाटील
ईश्वरपूर : एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला आहे. विशेषता उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक जिंकण्याचा विडाच उचलला आहे. गतपालिका निवडणुकीत प्रभाग १ वर भाजपचे वर्चस्व होते. परंतु, आमदार जयंत पाटील यांनी भाजपमधील ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक विजय कुंभार आणि माजी नगरसेविका सुप्रिया पाटील यांचे पती महेश पाटील यांनाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घेऊन प्रभाग १ मध्ये भाकरी परतल्याने राजकीय हवा विरळ झाली. यामध्ये शिवसेनेला शह देण्याचा आमदार जयंत पाटील यांचा डाव आहे.
उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग १ मध्ये भाजपचे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी पालिकेच्या विविध योजनेतून विकास केला आहे. सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून प्रभागात स्वत:ची ताकद वाढवली. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत माजी नगरसेविका सुप्रिया पाटील यांच्या विरोधात आमदार जयंत पाटील गटाकडे उमेदवारच नव्हता. प्रभाग १ मध्ये भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहून आमदार जयंत पाटील यांनी विजय कुंभार आणि महेश पाटील यांना आपल्या पक्षाचे प्रवेशद्वार खुले करत प्रभाग १ मध्ये विजय कुंभार आणि सुप्रिया पाटील यांना उमेदवारी देऊन भाकरी परतली.
वाचा: शिराळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदेसेनेत हायव्होल्टेज सामना, नगराध्यक्षपदासाठी 'काका-पुतण्या' लढत
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार प्रभाग ७ मध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यांना शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना उमेदवारी देऊन शिवसेनेलाच धक्का देण्याचा कार्यक्रम आखला आहे, तर प्रभाग १ मध्ये आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने सचिन कोळेकर यांना उमेदवारी देऊन आमदार जयंत पाटील गटाचे उमेदवार विजय कुंभार यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा डाव शिंदेसेनेने आखला आहे.
वाचा: तासगावात निर्णायक ठरणार नाराजीचा पॅटर्न, अजित पवार गट चर्चेत
तरीही काट्याने काटा काढण्याची खेळी आमदार जयंत पाटील यांनी विजय कुंभार यांनाच उमेदवारी देऊन प्रभाग क्र. १ मध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी स्वत: आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शिंदेसेना विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात दुहेरी लढत रंगणार आहे.
प्रभाग १ मधील हवा गरम की नरम
प्रभाग १ मध्ये कुंभार हे नवखे उमेदवार असले तरी महेश पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. तर आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सचिन कोळेकर नवखे उमेदवार असून प्रभाग १ मधील हवा गरम की नरम, अशी चर्चा मतदारातून होत आहे.