एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही; सांगलीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवताना चुका झाल्या - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:32 IST2026-03-21T14:31:31+5:302026-03-21T14:32:19+5:30
...तर जयंत पाटील अडचणीत येतील

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही; सांगलीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवताना चुका झाल्या - चंद्रकांत पाटील
मिरज : महापालिकेत आम्ही निवडून आलो, मात्र जिल्हा परिषदेत मित्रपक्षांशी समन्वय साधण्यात काही चुका झाल्या, त्या मी प्रांजळपणे मान्य करतो, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, राजकारणात पराजय होत असतात. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. आमच्यामुळे तीन पिढ्यांचे वैर संपून जयंत पाटील व विशाल पाटील एकत्र आले. आम्ही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. प्रत्येक गोष्टीचा डाऊनफॉल ठरलेला असतो. गेल्या ४७ वर्षांच्या राजकारणात मला अनेकदा अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र माझ्या तपश्चर्येमुळे त्याचा परिणाम झाला नाही.
मिरज पंचायत समितीत सदस्यांच्या पळवापळवी करून काँग्रेसचा सभापती निवडून आल्याबाबत ते म्हणाले, या कर्माची फळे या जन्मीच भोगावी लागतील. या घटनेची विभागीय आयुक्त चौकशी करीत आहेत. खासदार विशाल पाटील हे भाजपवर खोटे आरोप करून ते लोकसभेत निवडून आले. पुढील निवडणुकीत ते निवडून येतील का याचा त्यांनी विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक, वैभव पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
...तर जयंत पाटील अडचणीत येतील
चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य केले. ते म्हणाले, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात होते, याला संजयकाका पाटील फक्त साक्षीदार आहेत. मी तर त्याचा पार्ट होतो. मी जर सर्व गोष्टी जाहीर केल्या, तर जयंत पाटील अडचणीत येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्पला हरविल्याचा अविर्भाव
महायुतीतील मित्र पक्षांच्या सदस्यांना फोडून महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, महाआघाडीचे नेते ट्रम्प यांना हरवल्यासारखा अविर्भाव दाखवत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.