शेततळ्यात बुडून आजोबाचा मृत्युः नातवाला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:34 IST2026-04-17T13:34:57+5:302026-04-17T13:34:57+5:30
सात वर्षांच्या चिमुकल्याचा जीव दोन लहान बहिणींनी प्रसंगावधान राखत वाचवला.

शेततळ्यात बुडून आजोबाचा मृत्युः नातवाला वाचवले
बेळंकी: एरंडोली (ता. मिरज) येथे शेततळ्यात बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेत सात वर्षांच्या चिमुकल्याचा जीव दोन लहान बहिणींनी प्रसंगावधान राखत वाचवला. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार (दि. ११) रोजी एरंडोली येथील शिरदवडे मळ्यात संभाजी श्रीपती शिरदवडे (वय ४८) हे आपल्या नातू आरवसोबत दुपारच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेजारी राहणारी सृष्टी सूर्यवंशी (वय ११) हीदेखील तेथे पोहण्यासाठी आली होती. पाण्यात उतरताना संभाजी शिरदवडे यांनी नातवाला पाठीवर घेऊन सुळकी मारली. मात्र, ते पाण्यावर आले नाहीत. दरम्यान, आरव गटांगळ्या खात असल्याचे पाहून सृष्टीने शिवन्या शिरदवडे (वय १०) हिला सोबत घेत पाण्यात उतरून बुडणाऱ्या आरवला सुरक्षित बाहेर काढले. तिच्या या धाडसामुळे आरवचा जीव वाचला. त्यानंतर दोघींनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र, संभाजी शिरदवडे यांना वाचवता आले नाही.