Sangli ZP: सदस्य अपहरणाची तक्रार, पहाटे पोलिसांकडून झाडाझडती; अध्यक्ष निवडीपूर्वी घडले नाट्य, जयंत पाटलांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:03 IST2026-03-19T16:02:19+5:302026-03-19T16:03:06+5:30
'त्यांनी' आम्हाला मोलाची मदत केली

Sangli ZP: सदस्य अपहरणाची तक्रार, पहाटे पोलिसांकडून झाडाझडती; अध्यक्ष निवडीपूर्वी घडले नाट्य, जयंत पाटलांनी केली टीका
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री म्हणजे मंगळवारी (दि. १७) रात्री पोलिसांनाही भूमिका पार पाडावी लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) सदस्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आल्याने पोलिसांनी पहाटे ३ वाजता हॉटेलवर धाव घेतली.
भाजपच्या ऑपरेशन लोटसचा धोका टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सदस्य गेले दोन-तीन दिवस महाबळेश्वर आणि कोकणात फिरत होते. मंगळवारी ते कराडमध्ये एका हॉटेलमध्ये एकत्र आले. बुधवारी सकाळी थेट जिल्हा परिषदेत येण्याचे नियोजन होते.
यादरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये सदस्यांशी संवाद साधला. ते बाहेर पडताच काही वेळातच उंब्रजच्या महिला पोलिस उपअधीक्षक हॉटेलमध्ये सहकाऱ्यांसोबत आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) सदस्यांच्या अपहरणाची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व सहा सदस्य त्यांच्यासमोर हजर झाले. त्यांनी आपली ओळख सांगितली. चौघा सदस्यांनी स्वत: राजीखुशीने येथे आल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांचे छायाचित्रणही केले. या धांदलीत दोघे सदस्य मात्र बाहेर पडले. अर्थात, त्यांनी बुधवारी प्रत्यक्ष मतदानावेळी भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान केले. आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, ‘संजय पाटील यांच्या या कृत्यामुळे आम्हाला नव्याने रणनीती आखावी लागली.
निवडीच्या आदल्या रात्री त्यांनी भाजपसोबत जाऊन राजकारणातला नवा मार्ग आम्हाला दाखवला. याबाबत मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला मोलाची मदत केली. पहाटे ३ वाजता महिला सदस्यांच्या खोलीत पोलिस घुसतात हे चुकीचे आहे.