Sangli Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून; गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याने आईने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:51 IST2025-05-21T12:51:34+5:302025-05-21T12:51:47+5:30
दोघे संशयित ताब्यात

Sangli Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने एकाचा खून; गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याने आईने संपवले जीवन
कवठेमहांकाळ : दारू प्यायला पैसे दिले नसल्याच्या कारणावरून कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आला. अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर (वय ४०, रा. कुकटोळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
स्वप्नील तानाजी क्षीरसागर (वय २७), सुशांत शंकर शेजुळ (वय २५, दोघे रा. कुकटोळी) या दोन संशयितांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याचा धक्का बसल्याने सुशांत शेजुळ याच्या आईने राहत्या घरी आत्महत्या केली.
मृत अजित उर्फ संजय क्षीरसागर यांचे कुकटोळीपासून चार किलोमीटर अंतरावरील बंडगरवाडी येथे घर आहे. अजित हे रविवार १८ मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र ते मिळाले नाहीत.
सोमवारी दुपारी गावातील हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान अजित यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.
कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गावातील नागरिकांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता गावातील चुलत भाऊ स्वप्नील व त्याचा मित्र सुशांत हे त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले. दोघे गावातून फरारी झाल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.
अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अजित यांची पत्नी सीमा क्षीरसागर यांनी याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत.
खुनाचे कारण आले समोर
कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खुनाचे कारण समोर आले. संशयितांनी मृत अजित यांच्याकडे दारू प्यायला पैसे मागितले होते. तसेच सुशांत याने काही दिवसांपूर्वी अजित यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. अजित यांनी ते पैसे परत मागितले. यातून त्यांच्यात वाद झाला. स्वप्नीलने अजित यांना लाथाबुक्क्याने मारहाण करीत त्याच्या पायावर दगड मारला, तर सुशांत शेजुळ याने दगड डोक्यात घातला. याबाबतची कबुली संशयितांनी दिली.
संशयिताच्या आईची आत्महत्या
खूनप्रकरणी सुशांत शेजुळ याचे नाव आल्यानंतर या घटनेचा जबरदस्त धक्का त्याच्या आईला बसला. मुलाचे कृत्य कळताच त्याची आई विमल शंकर शेजुळ (वय ४३) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन मंगळवारी पहाटे आत्महत्या केली. सुशांतचे वडील लहानपणीच मृत झाले होते. सुशांत एकुलता असल्याने तसेच खूनप्रकरणात त्याचे नाव आल्याने त्याच्या आईला धक्का सहन करता आला नाही. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली आहे.