Sangli Politics: स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे काँग्रेस सोडली - पृथ्वीराज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:37 IST2025-08-19T19:37:18+5:302025-08-19T19:37:58+5:30
सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये

Sangli Politics: स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे काँग्रेस सोडली - पृथ्वीराज पाटील
सांगली : काँग्रेस पक्षाचे प्रामणिकपणे काम केले. सर्व जबाबदारी पार पाडली. २०१९ आणि २०२४ या विधानसभेमध्ये पक्षातूनच स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे पराभव झाला. तरी सारे विसरून काम करण्यास तयार होतो. परंतु, प्रदेशाध्यक्ष व पक्षनेतृत्वाकडून पुन्हा २०२९ असे घडणार नाही असा शब्द दिला नाही. तसेच स्थानिक नेतृत्वाने तुम्ही आता महापालिकेत नेतृत्व करा विधानसभेला आमच्याच घरातला उमेदवार असेल असे म्हणत विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, अशी टीका काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
पृथ्वीराज पाटील यांनी नुकतेच मुंबई येथे भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांनतर त्यांनी पहिल्यांदाच सांगलीत सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजप पक्ष प्रवेशाबद्दलची सविस्तर भूमिका मांडली. पृथ्वीराज पाटील म्हणाले, माझे वडील गुलाबराव पाटील व मला काँग्रेस पक्षाने भरपूर दिले. आम्ही दोघांनी आमची जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडत पक्षासाठी अहोरात्र काम केले. माझ्या वडिलांनाही तेव्हा काँग्रेसमध्ये भरपूर त्रास झाला. परंतु तो संघर्ष व मतभेद बाजूला ठेवून मागील दहा वर्षांपासून काँग्रेससाठी सर्व काही दिले.
२०१९ च्या विधानसभेत अत्यंत कमी फरकाने पराभव झाला. यानंतर मी पुन्हा सक्रियपणे काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून काम केले. २०२४ च्या लोकसभेला सांगलीची जागा मिळावी यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो. खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु विधानसभेला मला उमेदवारी मिळाली असताना माझ्या समोर बंडखोरी केली. दुसऱ्यावेळी विश्वासघातामुळे माझा पराभव झाला. माझे कार्यकर्ते खचले होते. तरी त्यांना सावरून मी काँग्रेसचे कार्य करत होतो. पण, मला राज्य नेतृत्वाने पुन्हा २०२९ माझ्यासोबत असे घडणार नाही याची हमी दिली नाही. पुढील विधानसभेला पुन्हा दगा फटक्याने पराभव होण्यापेक्षा सांगली विकासासाठी सत्तेसोबत जाणे मला पटल्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेचे नेतृत्व करण्याचा सल्ला
पुढील विधानसभेला आमच्या घरातीलच उमेदवार असणार आहे. तुम्ही दोनवेळा पराभूत झाला असल्यामुळे आता महापालिकेत नेतृत्व करा, असा सल्ला स्थानिक नेतृत्वाने दिला. अशा पद्धतीने सातत्याने माझा विश्वासघात केला असे नाव न घेता खासदार विशाल पाटील यांच्यावर पृथ्वीराज पाटील यांनी टीका केली.
सपकाळ, विश्वजित यांच्याशी चर्चा
दोन्ही विधानसभेला स्थानिक नेतृत्वामुळे मला पराभूत व्हावे लागले. पुन्हा २०२९ च्या निवडणुकीत मागील पुनरावृत्ती यांची हमी मी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विश्वजित कदम यांच्याकडे मागितली. मात्र त्यांनी त्याचे उत्तर ठामपणे देणे टाळल्याचे पृथ्वीराज पाटील म्हणाले.