सांगलीत नेते आघाडीवर, उमेदवार पिछाडीवर; काँग्रेस व उद्धवसेनेचा वाद टोकाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:15 PM2024-04-08T13:15:01+5:302024-04-08T13:15:50+5:30

संजय राऊत व विश्वजित कदम यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली

Leaders Leading, Candidates Trailing In Sangli Lok Sabha Constituency, Controversy between Congress and Uddhav Sena is over | सांगलीत नेते आघाडीवर, उमेदवार पिछाडीवर; काँग्रेस व उद्धवसेनेचा वाद टोकाला 

सांगलीत नेते आघाडीवर, उमेदवार पिछाडीवर; काँग्रेस व उद्धवसेनेचा वाद टोकाला 

हणमंत पाटील

सांगली : लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धवसेनेचा वाद टोकाला गेला आहे. तो इतका की, महाविकास आघाडी तुटते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व वादात दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार चर्चेतून बाजूला पडले आहेत. उलट त्यांचे प्रचारक असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हेच प्रकाश झोतात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभेच्या १९ निवडणुका झाल्या. त्यापैकी तीन निवडणुकांचा अपवाद वगळता १६ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यात उद्धवसेनेने अचानक दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्ष प्रवेश घेतला. त्यानंतर आठ दिवसांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जाहीर सभेत चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली.

या घडामोडी इतक्या वेगाने झाल्या की, आपल्याशिवाय सांगलीत पर्याय नाही, असे वाटणारे काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले. महाविकास आघाडीत असूनही आम्हाला विश्वासात न घेता उद्धवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर जाहीर कशी केली. सांगलीत उद्धवसेनेची ताकद काय, एकतरी ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहे का? असे प्रश्न काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी उपस्थित केल्याने वादाची ठिणगी पडली.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपावर एकत्र बसून यावर चर्चा करण्याऐवजी ऐकमेकांवर उघडपणे टीकाटिप्पणी सुरू केली. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तर २०१४ व २०१९ या सलग दोन निवडणुकांत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवांचा पराभव का झाला, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मात्र, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई व दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन सांगलीची जागा सोडू नये, असा दावा केला. परंतु, हायकमांडकडूनही फारसी दखल घेण्यात आली नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मात्र संजय राऊत व विश्वजित कदम यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली. त्यामुळे सांगलीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांऐवजी या दोन नेत्यांचीच चर्चा रंगली आहे.

Web Title: Leaders Leading, Candidates Trailing In Sangli Lok Sabha Constituency, Controversy between Congress and Uddhav Sena is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.