पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:54 PM2024-05-24T23:54:07+5:302024-05-25T00:11:17+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: पहिल्या पाच टप्प्यात देशातील बहुतांश मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर आता पूर्वांचल अर्थात पूर्व उत्तर प्रदेशमधील मतदानाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे या भागातील एका टोकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी तर दुसऱ्या टोकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गृहजिल्हा गोरखपूर आहे. पण २०१४ लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता या भागातील भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली होती.

पहिल्या पाच टप्प्यात देशातील बहुतांश मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर आता पूर्व उत्तर प्रदेशमधील मतदानाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे या भागातील एका टोकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी तर दुसऱ्या टोकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गृहजिल्हा गोरखपूर आहे. पण २०१४ लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता या भागातील भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने आपल्या ५ जागा गमावल्या होत्या. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तर येथील अनेक जिल्ह्यांत भाजपाचा सफाया झाला होता. त्याशिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३ जागांवर भाजपा किरकोळ आघाडीसह भाजपाचा विजय झाला होता. त्यामुळे आता यावेळच्या लोकसभा निवडणुकीत वर उल्लेख केलेल्या आठ मतदारसंघात काय समिकरणं जुळताहेत, याचा घेतलेला हा आढावा.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला होता. यादव आणि मुस्लिमबहूल असलेल्या या जागेवर एमवाय फॉर्म्युला काम करतो. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यांचे बंधू धर्मेंद्र यादव यांचा पराभव झाला होता. भोजपूरी कलाकार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ याने त्यांचा किरकोळ मताधिक्याने पराभव केला होता. मात्र २०२४ मधील समिकरणं ही समाजवादी पक्षासाठी अनुकूल आहेत. कारण पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेले गुड्डू जमाली आता समाजवादी पक्षात आहेत. तर उमेदवार बदलल्याने यावेळी बसपाचा प्रभाव दिसत आहे.

मागच्या निवडणुकीत घोसी लोकसभा मतदारसंघातून बसपाचे अतुल राय १ लाख २२ हजार ५६८ विजयी झाले होते. आता यावेळी सपा आणि बसपाने तगडे उमेदवार उतरवले आहेत. सपाने राजीव राय तर बसपाने बालकृष्ण चौहान यांना उमेदवारी दिली आहे. बालकृष्ण हे येथून एकदा खासदार बनले होते. तर एनडीएने सुभासपाचे अनिल राजभर यांना उमेदवारी दिली आहे. अनिल राजभर हे ओमप्रकाश राजभर यांचे पुत्र आहेत. भाजपाने येथील समिकरणं जुळवण्यासाठी घोसी येथील दारासिंह चौहान यांना पक्षात घेतले होते. मात्र बसपाचे उमेदवार हेही त्यांच्याच जातीचा असल्याने त्याचा फायदा एनडीए उमेदवारांला मिळणार नाही. त्याचप्रमाणे भाजपाला सवर्ण (भूमिहार) मतं मिळण्याची शक्यताही कमी आहे. कारण सपाने भूमिहार समुदायातील उमेदवार दिलेला आहे.

गाझीपूरमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे अफजाल अंसारी यांनी विजय मिळवला होता. अफजाल अंसारी यांनी मनोज सिन्हा यांना १ लाख १९ हजार ३९२ मतांच्या फरकाने पराभूत केले होते. यावेळी मनोज सिन्हा यांचे निकटवर्तीय पारसनाथ राय यांना भाजपाने तिकीट दिले आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल बनल्यापासून आणि मोदींचे निकटवर्तीय असल्याची चर्चा असल्याने या मतदारसंघात मनोज सिन्हा यांचा प्रभाव आहे. मात्र मुख्तार अंसारी याच्या हत्येमुळे सपाचे उमेदवार अफजाल अंसारी यांना सहानुभूतीची मतं मिळू शकतात. यावेळी बसपा अफजाल अंसारीसोबत नाही आहे. त्यामुळे येथील लढाई अटीतटीची होऊ शकते.

जौनपूर लोकसभा मतदारसंघातही २०१९ मध्ये भाजपाचा पराभव झाला होता. येथून बसपाच्या श्याम सिंह यादव यांनी विजय मिळवला होता. १९८९ ते २०१४ या काळात भाजपाने येथून चार वेळा विजय मिळवला होता. यावेळी भाजपाने जौनपूर येथून कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना सपाचे बाबू सिंह कुशवाहा यांच्याशी होत आहे. बाबू सिंह कुशवाहा हे बसपामध्ये असताना अतिमागास लोकांचे नेते म्हणून ओळखले जात असत. तर बसपाने श्याम सिंह यादव यांना पुन्बा संधी दिली आहे. बसपाचा उमेदवार पिछाडीवर पडला तर सपाला फायदा होऊ शकतो. मात्र बाहुबली धनंजय सिंह याने भाजपाच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केल्यापासून येथे भाजपाला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लालगंज लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. २०१४ मध्ये भाजपाने या जागेवरून विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाच्या नीलम सोनकर यांनी बाजी मारली होती. पण २०१९ मध्ये सपा आणि बसपाने एकत्र निवडणूक लढवत येथे भाजपाचा पराभव केला होता. यावेळी भाजपाने पुन्हा एकदा नीलम सोनकर यांना संधी दिली आहे. तर बसपाने डॉ. इंदू चौधरी यांना रिंगणात उतरवले आहे. तर सपाने सरोज यांना उमेदवारी दिली आहे. लालगंजमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे अडीच लाख मुस्लिम तर दोन लाख यादव मतदार आहेत. तसेच अतिमागास आणि दलितांची मतंही निर्णायक ठरतात. त्यामुळे येथील विजय हा बसपा उमेदवाराच्या बळावर निर्धारित होणार आहे.

याशिवाय पूर्व उत्तर प्रदेशमधील तीन मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपाने कसाबसा विजय मिळवला होता. हे तीन मतदारसंघ कायम राखताना भाजपाची कसोटी लागणार आहे. हे तीन मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.

मछलीशहर लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपाचे उमेदवार बी.पी. सरोज यांनी अवघ्या १८१ मतांनी विजय मिळवला होता. आता सरोज यांच्याकडे हॅटट्रिकची संधी आहे. त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्यांच्याविरोधात सपाने तीन वेळा खासदार राहिलेल्या तुफानी सरोज यांच्या कन्या प्रिया सरोज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे भाजपाची कसोटी लागण्याची शक्यता आहे.

चंदौली लोकसभा मतदारसंघात मागच्यावेळी भाजपाच्या महेंद्र नाथ पांडेय यांनी १३ हजार ९५९ मतांनी विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये ते येथून दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र यावेळी येथील लढत अटीतटीची आहे. सपाने येथे वीरेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर बसपाने सतेंद्र कुमार मौर्य यांना संधी दिली आहे. चंदौलीमध्ये मौर्य मतदार हे निर्णायक भूमिकेत असतात. तसेच ते कायम भाजपाला मतदान करतात. मात्र यावेळी बसपाने मौर्य उमेदवार दिल्याने त्याचा फटका भाजपाला बसू शकतो.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मतदारसंघ असलेल्या बलियामध्ये २०१९ मध्ये भाजपाचे वीरेंद्र सिंह मस्त हे अवघ्या १५ हजार ५१९ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे यावेळी भाजपाने त्यांच्याऐवजी चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना उमेदवारी दिली आहे. नीरज शेखर यांच्यासमोर सपाचे सनातन पांडेय आणि बसपाचे ललन सिंह यादव यांचं आव्हान आहे. यावेळी नीरज शेखर यांचं पारडं जड आहे. मात्र सनातन पांडेय त्यांचा खेळ बिघडवू शकतात.