Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

By जितेंद्र कालेकर | Published: May 24, 2024 11:42 PM2024-05-24T23:42:09+5:302024-05-24T23:42:31+5:30

Thane News: लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन लक्ष्मण जंगले (३१) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

Thane: Hit on hand for mobile theft, passenger loses both legs, mob action in Thane | Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

- जितेंद्र कालेकर 
ठाणे - लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन लक्ष्मण जंगले (३१) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी कामाला असलेल्या जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली. ठाणे स्थानक सोडल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला. यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते यात गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने, तसेच पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले.
 
रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी
जगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागल्याची माहिती त्यांचे मेव्हणे प्रशांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची, तसेच रुग्णालयीन खर्च रेल्वे प्रशासनाने भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाणे रेल्वे पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाइल कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी दिली.

Web Title: Thane: Hit on hand for mobile theft, passenger loses both legs, mob action in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.