Sangli ZP: ‘करेक्ट कार्यक्रमा’चा डाव, चंद्रकांत पाटील-जयंत पाटील यांच्यातील रस्सीखेच अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:12 IST2026-03-13T19:11:59+5:302026-03-13T19:12:53+5:30
जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोण कोणाचा ‘कार्यक्रम’ करणार याची चर्चा

Sangli ZP: ‘करेक्ट कार्यक्रमा’चा डाव, चंद्रकांत पाटील-जयंत पाटील यांच्यातील रस्सीखेच अंतिम टप्प्यात
अशोक पाटील
ईश्वरपूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष झेडपीच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन पोहचला आहे. याठिकाणी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून पालकमंत्र्यांना शह देण्याची खेळी जयंत पाटील यांच्याकडून सुरू असून चंद्रकांतदादाही ही खेळी अयशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. १८ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये दोन्ही नेत्यांत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना मताधिक्य घटल्याने चांगलाच धक्का बसला. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा पालिकेवर मिळालेले यश जयंत पाटील यांच्या समर्थकांना दिलासादायक ठरले. या विजयानंतर आ. पाटील यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. जिल्हा परिषदेमध्ये पक्षाला क्रमांक एकवर पोहचविले.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीत काही ठिकाणी जयंत पाटील यांनी महायुतीला चकमा देत स्थानिक आघाडीशी युती करून शिराळा आणि मिरजमध्ये सत्ता काबीज केली. कवठेमहांकाळमध्ये आ. रोहित पाटील यांनी बाजी मारली, तर आटपाडीत शिंदे सेनेच्या आ. सुहास बाबर यांनी भाजपला आस्मान दाखवले. या सर्व पडझडीमुळे आता १८ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्पर्धेत पालकमंत्री आणि जयंत पाटील यांच्यात सत्तेसाठी चांगली जुंपली आहे.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महायुतीतील काही पक्षांचे सहकार्य घेत जयंत पाटील ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या तयारीत असले तरी चंद्रकांत पाटीलसुद्धा वरिष्ठ पातळीवर दबावतंत्राचा वापर करून महायुतीची बेरीज सत्तेच्या बाजूने करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोण कोणाचा ‘कार्यक्रम’ करणार याची चर्चा मात्र वाळवा-शिराळा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.
जिल्ह्यातील एकाच विचाराचे नेते एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करतील. आमचे नेते आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाला निश्चित यश येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे यश जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी कामी येऊ शकेल. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष