Sangli Politics: विषय संपवा म्हणून जयंत पाटील यांचा फोन, चंद्रकांत पाटील म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:37 IST2025-10-03T14:36:43+5:302025-10-03T14:37:36+5:30
'भाजपमध्ये आले, तर जयंत पाटील यांना मागे बसावे लागेल'

Sangli Politics: विषय संपवा म्हणून जयंत पाटील यांचा फोन, चंद्रकांत पाटील म्हणाले..
सांगली : विषय संपवा म्हणून जयंत पाटील यांचा फोन आला होता. पण, वार झाला आता प्रतिवार होणारच, असे त्यांना मी स्पष्टपणे सांगितले. आजच्या सभेने त्यांची परतफेड झाली आहे. आम्ही गप्प बसलो नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सांगलीत बुधवारी भाजपची सभा पार पडली. यावेळी पुतळ्यास विकृत संस्कृतीचा रावण असे नाव देत त्याचे दहन केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे म्हणणाऱ्याला कारे म्हणण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. इशारा सभा होऊ नये, असे जयंत पाटील यांना वाटत होते. जयंत पाटील यांचे साखर कारखाने लाटण्याचे प्रकरण ही तर केवळ प्रस्तावना आहे. दगाबाज पुस्तक वाचा. महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले हे तुम्हाला समजेल. बहुजन समाजातील, गावगाड्यातील व्यक्ती ओबीसी आरक्षणामुळे सरपंच होते, तो सरपंच मंचावर बसतो, तुम्हाला खाली बसावे लागते, हे तुम्हाला पटलेले नाही. महाराष्ट्राची ही स्थिती दगाबाजाने निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या दगाबाजाने किती साखर कारखाने घेतले, कुठे मालमत्ता ठेवली? हे सारे गुपित आहे. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात एक गाडीही त्यांच्या नावावर नाही. पण, त्यांची किती विमाने आहेत, कोणत्या विमान कंपन्यात गुंतवणूक आहे, हे आम्हाला माहिती आहे. आता वेळीच शहाणे व्हा, असा इशारा देण्यासाठी ही सभा आहे. तुम्ही शिव्या देणारी पिलावळ उभी केली. या विकृतीच्या रावणाला आम्ही जाळत आहोत. आम्ही ठिकाणावर आहोत, तुम्ही ठिकाणावर राहा.
भाजपमध्ये आले, तर जयंत पाटील यांना मागे बसावे लागेल
आमदार जयंत पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका, अशी मागणी आ. गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक यांनी सभेत केली. तो धागा पकडत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव, कुणाला भेटतात, कधी भेटतात, हे मला माहीत आहे. पण, ते भाजपमध्ये आले तर त्यांना मागे बसावे लागले. जिल्ह्यात ते ज्युनिअर, तर गोपीचंद सिनीअर आहेत. त्यांना ‘गोपीचंद तुम आगे बढो’च्या घोषणाही द्यावी लागतील. पण, ते भाजपमध्ये येणार नाहीत. कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. ही भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवू.