घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:42 IST2025-10-01T15:42:08+5:302025-10-01T15:42:28+5:30
सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले.

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे
सांगली : तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १० लाख ३१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीकडून विविध पोलिस ठाण्यांत दाखल तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत.
आकाश कल्लाप्पा काळे (वय २७, रा. एकतानगर, सातारा रस्ता, जत, जि. सांगली ), सचिन अभिमान काळे (३२, रा. यल्लमावाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), दत्ता संपत चव्हाण (५४, रा. एकतानगर, जत) आणि गोविंद राजू काळे (२८, रा. उमराणी रस्ता, जत) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपासून जिल्ह्यातील घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. इस्लामपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलिस अंमलदार प्रमोद साखरपे, संजय पाटील आणि हणमंत लोहार यांना खबऱ्यांमार्फत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चारही संशयितांची माहिती मिळाली.
पथकाने चौघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिस तपासात संशयित आकाश काळे याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडी करण्याकरिता चौघेजण चारचाकीचा (क्र. एमएच १२-पीझेड २१९८) वापर करीत होते.
चारही गुन्हेगारांनी इस्लामपूर, आटपाडी, विटा, कडेगाव, पेठवडगाव तसेच तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीची चारचाकी, ५ लाख १८ हजारांचे ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १३ हजारांचे चांदीचे दागिने तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे कटावणी, लोखंडी पाना, स्कू ड्रायव्हर आदी साहित्य हस्तगत केले.
संशयित रेकाॅर्डवरील गुन्हेगार
एलसीबीने अटक केलेले चारही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाणे तसेच कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा, घरफोडी, चोरी, मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.