Sangli Crime: मृत व्यक्ती जिवंत दाखवून विमा कंपनीला १६ लाखांचा गंडा, सहाजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:47 IST2025-12-01T17:47:20+5:302025-12-01T17:47:59+5:30
विमा दावा मंजूर केला. परंतु, नंतर हा प्रकार लक्षात आला.

Sangli Crime: मृत व्यक्ती जिवंत दाखवून विमा कंपनीला १६ लाखांचा गंडा, सहाजणांवर गुन्हा दाखल
कोकरूड : आंबाबाईचीवाडी (हत्तेगाव, ता. शिराळा) येथील मृत व्यक्ती जिवंत भासवून त्याचा विमा उतरवून तो पुन्हा हार्ट अटॅकने मृत झाल्याचे दाखवून विमा कंपनीची १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विमा कंपनीने सहाजणांविरुद्ध कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित विमा प्रतिनिधी कोमल संतोष दराडे (रा. कदम चाळ, करपेवाडी पूर्व, ठाणे), विमा पॉलिसी वारसदार लक्ष्मी भगवान अस्वले (वय ३६, रा. हातेगाव), एजन्सीचा तपास अधिकारी अझर रहमुल अलम (रा. नाॅनपारा, सराईघर, जि. सुपाऊल, बिहार), शिंदेवाडी-मांगरूळचा ग्रामसेवक राजेंद्र विलास काळे (रा. शिराळे खुर्द), माऊली हॉस्पिटल कोकरूडचा डॉ. प्रशांत डी. ठोंबरे (रा. कोकरूड), हत्तेगावचा पोलिस पाटील विठ्ठल पांडुरंग उंडाळकर (रा. हत्तेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आंबाबाईचीवाडी येथील भगवान ज्ञानदेव अस्वले यांचा २० मार्च २०२३ रोजी मृत्यू झाला आहे. मात्र, एका खासगी विमा कंपनीच्या प्रतिनिधी कोमल दराडे हिने लक्ष्मी अस्वले यांना आर्थिक आमिष दाखवले. अस्वले यांचे मृत पती भगवान ज्ञानदेव अस्वले यांचे दि. २० मार्च २०२३ रोजी निधन झाले.
परंतु, ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो काढून विमा कंपनीच्या टॅबवरून निश्चित समृद्धी प्लॅन हा विमा दि. २० डिसेंबर २०२४ रोजी उतरवला. त्यानंतर अस्वले यांचा दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे भासवले. विमा रकमेसाठी कंपनीकडे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी क्लेम केला.
कंपनीकडून विमा रक्कम हडप करण्यासाठी संशयितांनी संगनमत केले. ग्लोबल इन्व्हेस्टिगेशन कंपनीचा प्रतिनिधी अझर अलम याने स्थानिक सर्वेक्षण करून वारसांनी क्लेमसाठी दिलेली कागदपत्रे खरी असल्याबाबत चुकीचा अहवाल विमा कंपनीकडे दिला. शिंदेवाडीचा तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र काळे याने अस्वले हे दि. १० फेब्रुवारी रोजी राहते घरी मृत झाल्याचा मृत्यूचा दाखला दिला, तर डॉ. प्रशांत ठोंबरे याने अस्वले हे घरी मृत झाले असून त्यांची घरी जाऊन तपासणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले. तसेच हत्तेगावचा पोलिस पाटील उंडाळकर याने अस्वले यांच्यावर शिंदेवाडी गावात अंत्यसंस्कार केल्याचा चुकीचा दाखला दिला.
विमा कंपनीने प्रतिनिधी, वारसदार व इतर संशयितांवर विश्वास ठेवून १६ लाख २ हजार ६१० रुपयांचा विमा दावा मंजूर केला. परंतु, नंतर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
चौकशीत पर्दाफाश
विमा कंपनीने केलेल्या पडताळणीत प्रतिनिधीसह सहाजणांनी संगनमत करून पैसे हडप करण्याचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपव्यवस्थापक वासुदेव दिगंबर टिकम (रा. विक्रोळी, मुंबई) यांनी दि. २९ रोजी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.