अंधश्रद्धेचा कहर; सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विद्यार्थ्यावर ‘करणी’, फोटोभोवती लिंबू, हळद-कुंकू, तांत्रिक साहित्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:32 IST2026-03-27T12:30:43+5:302026-03-27T12:32:23+5:30
कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार

अंधश्रद्धेचा कहर; सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विद्यार्थ्यावर ‘करणी’, फोटोभोवती लिंबू, हळद-कुंकू, तांत्रिक साहित्य
आटपाडी : सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विज्ञानयुगालाही लाजवेल, अशी अंधश्रद्धेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली.
खरसुंडीतील विराज नाना पाटील हा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी असून, ‘अन्नपूर्णा नाष्टा सेंटर’ चालवत तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण आणि व्यवसाय यांचा ताळमेळ साधत विराजने गावात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या डोळ्यात हीच प्रगती खुपल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी विराजच्या नाष्टा सेंटरसमोर अत्यंत विचित्र आणि अघोरी प्रकार उघडकीस आला. त्याच्या फोटोभोवती चार लिंबे, हळद-कुंकू, काळ्या रंगाच्या आकृत्या आणि काही तांत्रिक साहित्य ठेवण्यात आले होते. या दृश्याने नागरिकांच्या अंगावर काटा आला. हा प्रकार ‘भानामती’ किंवा करणी करण्यासाठीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
समाजकंटकांवरोधात कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर गावात विविध चर्चांना उधाण आले असून, हा सर्व प्रकार मत्सरातूनच घडवून आणल्याचा कयास बांधला जात आहे. या घटनेमुळे खरसुंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, दोषींना शोधून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खरसुंडीतील ही घटना केवळ एका मुलावरचा अन्याय नसून, समाजाच्या विवेकबुद्धीला दिलेले आव्हान असल्याची भावना व्यक्त होत आहे.