Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:31 IST2025-11-26T13:30:16+5:302025-11-26T13:31:27+5:30
नुसरत शेख आणि तिच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे

Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली
मिरज : सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांची लूटमार केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाला व कर्नाटकातील एका तरुणास लुबाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कोल्हापूर येथील अब्दुल पाथरवट यांना जाळ्यात ओढून दोन लाखांची लूट केल्याप्रकरणी नुसरत शेख आणि तिच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील जहाँआरा मुल्ला ही फरार आहे. नुसरत शेखने याच पद्धतीने फेसबुकवर मैत्री करून मिरजेतील एकाकडून दोन लाख तर अन्य दोघांकडून वीस हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. तिघांनीही पोलिसांकडे यांची तक्रार केली आहे. नुसरतने कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाला व कर्नाटकातील चिकोडी येथील एकास अशाच प्रकारे लुटल्याची माहिती मिळाली आहे. मात्र संबंधितांनी अद्याप तक्रार दिलेली नाही असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
कोल्हापुरातील अब्दुल पाथरवट यांना मिरजेत एका फ्लॅटवर बोलावून, नुसरत शेखच्या साथीदार मोहसीन शेख, समीर कच्छी, रशिद सय्यद व जहाँआरा मुल्ला यांनी त्यास मारहाण केली. पाथरवट याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल चार तास डांबण्यात आले. या टोळीने त्यांच्याकडून सोन्याची चेन, अंगठी व २२ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी नुसरत शेख, मोहसीन शेख, समीर कच्छी, रशिद सय्यद तसेच फिरोज बाबू मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने आणखी काहींना अशाच पद्धतीने फसवले असल्याने हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.