Sangli: शिराळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदेसेनेत हायव्होल्टेज सामना, नगराध्यक्षपदासाठी 'काका-पुतण्या' लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:06 IST2025-11-26T18:04:50+5:302025-11-26T18:06:06+5:30
प्रचारातील कळीचे मुद्दे असे...

Sangli: शिराळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदेसेनेत हायव्होल्टेज सामना, नगराध्यक्षपदासाठी 'काका-पुतण्या' लढत
विकास शहा
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज माघारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर आता नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदासाठी चक्क काका-पुतण्यामध्येच प्रमुख लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथे झालेल्या युतीमुळे सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका-टिप्पणी सुरू आहे.
अर्ज माघारी घेण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ नेत्यांची धावपळ, आश्वासने आणि मनधरणीला मोठे यश आले असून, अनेक उमेदवारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. यामुळे आता लढत थेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप- शिंदेसेना अशी दुरंगी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव सेनेचे अस्तित्व या निवडणुकीत दिसत नाही. येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेतेमंडळींनी वाऱ्यावर सोडले आहे.
वाचा: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी
निवडणुकीतील प्रमुख हायलाईट्स
काका-पुतण्या आमने - सामने : नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अभिजित नाईक आणि भाजप-शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक या ''काका-पुतण्या'' अशी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक, सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
भाजप-शिंदेसेनेकडून माेर्चेबांधणी
खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, ॲड. भगतसिंग नाईक, हणमंतराव पाटील, प्रतापराव यादव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वरिष्ठ नेत्यांची धावपळ
मुंबईतून युतीबाबतचे निर्णय झाल्याने स्थानिक नेत्यांवर मोठी जबाबदारी असून, सभा घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ आहे.
प्रचारातील कळीचे मुद्दे असे...
या निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासाचे मुद्दे गाजणार आहेत. नागपंचमी उत्सव आणि परंपरा तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शहरातील रखडलेली विकासकामे आणि ती कोणी रोखली, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.