अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतीला १५० कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:31 IST2025-10-20T17:30:41+5:302025-10-20T17:31:12+5:30
प्रशासनाकडून शासनाला अहवाल पाठविला : दोन दिवसात शेतकऱ्यांना होणार मदतीचे वाटप

संग्रहित छाया
सांगली : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि कृष्णा, वारणा नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे सुमारे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला असून, आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ९५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर या तालुक्यातील ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपले. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला.
सुरुवातीला शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने तालुक्यांमध्ये बाधित शेतीचे पंचनामे करून सुमारे ५० हजार हेक्टरपर्यंत शेती बाधित झाल्याचा अहवाल पाठवला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील उर्वरित खरीप पिके पाण्याखाली बुडाली. उभी पिके कुजली तर काडणी आणि मळणी झालेले धान्य भिजून खराब झाले. द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला. शेतकरीवर्गामध्ये सरसकट पंचनामे करण्याची मागणी सुरू झाली.
पूर्वी शासनाने जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. फेर सर्वेक्षणानुसार पलूस आणि कडेगाव तालुक्यांनाही बाधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार सुमारे ९५ हजार हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. दिवाळीच्या अगोदर भरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्यातील भरपाईचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. निधी मिळताच शासनाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा
शासनाच्या आदेशानुसार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडे सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून निधी मंजूर असून, लवकरच तो मिळणार आहे. येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.