खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, फटाके फोडून आनंदोत्सव; सांगलीत १४ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:20 IST2025-12-26T18:20:25+5:302025-12-26T18:20:39+5:30
परिसरात आरडाओरड, दंगा करत फटाके फोडत आनंदोत्सव

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, फटाके फोडून आनंदोत्सव; सांगलीत १४ जणांवर गुन्हे दाखल
सांगली : खुनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर गणपती मंदिरासमोर व गवळी गल्ली परिसरात आरडाओरड, दंगा करत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या १४ जणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संशयित वैभव नंदू साळसकर, अभिजित नंदू साळसकर, साहिल सय्यद, अमित ऊर्फ गोट्या कांबळे, गणेश पवार, सूरज माने, अक्षय गायकवाड (सर्व रा. गवळी गल्ली, सांगली), आकाश घबाडे (रा. सांगलीवाडी) आणि अनोळखी सहाजणांविरुद्ध पोलिस कर्मचारी विशाल कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव नंदू साळसकर हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आहे. त्याला अटक केल्यानंतर कळंबा कारागृहात त्याची रवानगी केली होती. नुकताच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. तो जामिनावर सुटून बुधवारी दुपारी सांगलीत आला. तेव्हा त्याचे साथीदार स्वागतासाठी सज्ज झाले होते. बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास गणपती मंदिरासमोर एकत्र येत त्यांनी आरडाओरड, दंगा केला. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर टोळक्याने गवळी गल्लीत जाऊन रामविश्वास डेअरीजवळही जल्लोष केला.
सांगली शहर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचा बंदी आदेश लागू आहे. या आदेशाचा तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलिस कर्मचारी विशाल कोळी यांनी आठ संशयित आणि सहा अनोळखी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितावर खुनाचा गुन्हा
संशयित वैभव साळसकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळंबा कारागृहात तो न्यायालयीन बंदी होता. सशर्त जामीन मिळाल्यानंतरही त्याने साथीदारांसमवेत दंगा केल्यामुळे टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.