भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची झडती

By Admin | Updated: May 27, 2015 01:01 IST2015-05-26T23:23:28+5:302015-05-27T01:01:47+5:30

तुरंबव प्रकरण : पोलीस कारवाईमुळे आमदार संतप्त

Find the office of Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची झडती

भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची झडती

चिपळूण : तुरंबव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद सर्वत्र उमटत असून, पोलीस दोन्ही गटातील आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयाची तपासणी केली. या घटनेमुळे आमदार जाधव संतप्त झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी तुरंबव-पालेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात दोन गटात मारहाणीचा प्रकार घडला. दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी सावर्डे पोलीस ठाण्यात देण्यात आल्या असून, तपासाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा काम करीत आहे.
काही संशयित आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मकेश्वर, उपनिरीक्षक अनंत कोकरे व अन्य सहकाऱ्यांनी आमदार जाधव यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यामध्ये कोणतीही गोष्ट संशयास्पद वाटली नाही. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात वेग यावा आणि यातील सर्व आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या मागणीपाठोपाठ काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनीही याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले आहे. त्यामुळे या कारवाईला आता राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)

Web Title: Find the office of Bhaskar Jadhav