जमिनीच्या मोबदल्यासाठी पुणे-मिरज रेल्वेमार्गावर वसगडेत शेतकऱ्यांचा रेल रोको, तब्बल सहा तास वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:38 IST2025-05-14T12:37:58+5:302025-05-14T12:38:29+5:30
मिरज : रेल्वे दुहेरीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर वसगडे येथे मंगळवारी ...

जमिनीच्या मोबदल्यासाठी पुणे-मिरज रेल्वेमार्गावर वसगडेत शेतकऱ्यांचा रेल रोको, तब्बल सहा तास वाहतूक विस्कळीत
मिरज : रेल्वे दुहेरीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर वसगडे येथे मंगळवारी शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे दुपारपासून पुणे ते मिरज रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल सहा तास ठप्प झाली. शेतकऱ्यांनी पुणे ते कोल्हापूर डेमू रोखल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल रोकोमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
पुणे - मिरज - लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणांसाठी वसगडे (ता. पलूस) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेने ताब्यात घेतल्या आहेत. जमीन अधिग्रहित करूनही अनेक शेतकऱ्यांना रेल्वेने भरपाई दिली नाही. रेल्वेमार्गालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सेवारस्ताही नाही. त्यामुळे रेल्वे दुहेरीकरणासाठी बाधित शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीसाठी वसगडे येथील शेतकरी गेले काही वर्षे आंदोलन करीत आहेत. एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ५ मेपर्यंत भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे व शेतकऱ्यांना भरपाईचे आदेश रेल्वेला दिले होते.
मात्र त्यानंतरही रेल्वेने प्रतिसाद दिला नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा रेल्वे रोकोचा इशारा दिला होता. मात्र रेल्वेने दखल न घेतल्याने वसगडे येथील शेतकऱ्यांनी पुणे ते मिरज मार्गावर मंगळवारी रेल रोको सुरू केले. यावेळी पुण्याहून मिरजेला डिझेल वाहतूक करणारी मालगाडी शेतकऱ्यांनी रोखली. पोलिसांच्या मध्यस्थीने डिझेल वॅगन सोडून दिली. त्यानंतर पुणे - कोल्हापूर डेमू शेतकऱ्यांनी रोखल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. भिलवडी पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जागेवर येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर सहा तासांनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गुरुवारी पुन्हा बैठकीचे आश्वासन दिल्याने रात्री १० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
रेल रोको आंदोलनामुळे पुणे ते कोल्हापूर डेमू, सातारा ते दादर व्हाया पंढरपूर एक्स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन ते वास्को-गोवा एक्स्प्रेस, दादर हुबळी एक्स्प्रेस, वटवा ते हुबळी एक्स्प्रेस, पुणे ते कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, उदयपूर ते मैसूर हमसफर एक्स्प्रेस, अजमेर ते मैसूर विशेष एक्स्प्रेस, श्री गंगानगर ते तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस या गाड्या आंदोलनामुळे विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.