सांगलीत पावसाचा जोर ओसरला तरी ‘वारणा’ पात्राबाहेर, कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, ७३७ कुटुंबांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:53 IST2025-08-21T11:53:20+5:302025-08-21T11:53:37+5:30
सांगलीत ४०.६ फुटांवर पाणीपातळी; चौदा जिल्हा मार्ग बंद

सांगलीत पावसाचा जोर ओसरला तरी ‘वारणा’ पात्राबाहेर, कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, ७३७ कुटुंबांचे स्थलांतर
सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रांसह जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, कोयना धरणातून ९५ हजार ३००, तर वारणा धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून २९ हजार ८०७ क्युसेकने चालू आहे. वारणा नदीचेपाणी पात्राबाहेर पडले असून, कृष्णा नदीने रात्री इशारा पातळी ओलांडून ४०.६ फुटांवर गेली आहे. पुरामुळे १४ जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद आहे. तसेच, महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यांतील १८३ कुटुंबांतील ७३७ लोकांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात ३३ मिलिमीटर, नवजा ४४ आणि महाबळेश्वर येथे ५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी १३.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस कमी असला, तरी कोयना धरण ९६ टक्के आणि वारणा ९३ टक्के भरले आहे. यामुळे कोयना धरणातून ९५ हजार ३०० क्युसेक, वारणा धरणातून बुधवारी सायंकाळी १० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून २९ हजार ८०७ क्युसेकने विसर्ग चालू आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात कृष्णा नदीची पाणी पातळी १५ फुटांनी वाढून ४०.६ फुटांवर गेली आहे.
सांगली शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, ईनामदार प्लाॅट, दत्तनगर, काकानगर परिसरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून, सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी व सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आले आहे. कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक या रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली.
४९२ नागरिकांचे स्थलांतर
पुराचा धोका वाढल्याने ४९२ नागरिकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे. कृष्णा नदीला पूर आल्यामुळे बाधित भिलवडी (ता. पलूस) येथील १९०, जुनेखेड ३८, गौडवाडी (ता. वाळवा) ८, वारणा नदीला पूर आल्यामुळे सोनवडे (ता. शिराळा) ९, असे एकूण १८३ कुटुंबांतील ७३७ नागरिकांचे जिल्हा प्रशासनाने स्थलांतर केले आहे.
१४ जिल्हा मार्ग बंद
कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील १४ जिल्हा मार्ग बंद असून, तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, नदीकाठचे पीक पाण्याखाली गेले आहेत.
तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊस
तालुका -पाऊस मिलिमीटरमध्ये
- मिरज - ९.१
- जत - ५.७
- खानापूर - १५.६
- वाळवा - १५.७
- तासगाव - १२
- शिराळा - ३४.२
- आटपाडी - १५.२
- क. महांकाळ - ७.४
- पलूस - १२.९
- कडेगाव - १५.८
कृष्णा नदीची पाणी पातळी (फूट इंचामध्ये)
- कृष्णा पूल कराड - ३७.९
- बहे पूल - १९.११
- ताकारी पूल - ५२.६
- भिलवडी पूल - ४६.२
- सांगली आयर्विन - ४०
- राजापूर बंधारा - ४४
- राजाराम बंधारा - ४०.११
जिल्ह्यातील हे रस्ते बंद
शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमणापूर, भिलवडी पुलाला पाणी लागल्यामुळे पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठा, विसर्ग
धरण / पाणीसाठा (टीएमसी) / टक्केवारी / विसर्ग (क्यूसेक)
- कोयना १०१.४६ / ९६ / ९५,३००
- वारणा ३१.५० / ९२ / २९,८०७
- धूम १३.०६ / ९७ / ९,८६२
- कण्हेर ९.४२ / ९३ / १०४६८
- उरमोडी ९.६४ / ९७ / ४३६७
- अलमट्टी १०४.५१ / ८५ / २,५०,०००