अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी बनवले ॲप्स, सांगली पोलिस दलातर्फे आयोजित ‘हॅकेथॉन’मध्ये २०७ विद्यार्थी सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:26 IST2025-10-03T16:25:22+5:302025-10-03T16:26:03+5:30
पोलिस-विद्यार्थी समन्वय

संग्रहित छाया
सांगली : नावीन्यपूर्ण पोलिसिंग आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलिस दलाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्मॉर्ट कॉप्स हॅकेथॉन’ उपक्रमात ६ अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४२ संघातील २०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पोलिसांनी सुचवलेल्या सहा विषयांवर विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण सॉफ्टवेअर्स, ॲप्स बनवले.
सध्याच्या काळात पोलिस दलाला काम करताना काही समस्या भेडसावतात. अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच पोलिसांच्या कार्यप्रणालीला बळकटी देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते. यातूनच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या संकल्पनेतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट कॉप्स हॅकेथॉन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
बुधगाव येथील पीव्हीपीआयटी कॉलेजमध्ये आयोजित स्पर्धेत नानासाहेब महाडिक कॉलेज पेठ, पीव्हीपीआयटी, संजय भोकरे इन्स्टिट्यूट मिरज, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आष्टा, आरआयटी इस्लामपूर या सहा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४२ संघातील २०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना पोलिस विभागाने सहा विषय दिले होते. त्याबाबत नावीन्यपूर्ण सॉफ्टवेअर्स, ॲप्स बनवण्याचे कौशल्य सादर करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या सॉफ्टवेअर, ॲप्सचे संगणक क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी परीक्षण केले.
स्पर्धेत ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ या विषयात पीव्हीपीआयटीने प्रथम व द्वितीय क्रमांक, महाडिक कॉलेज पेठने तृतीय क्रमांक मिळवला. ‘सर्च ॲन्ड ॲनालाईज सोशल मीडिया’ या विषयात पीव्हीपीआयटी बुधगाव, महाडिक कॉलेज पेठने द्वितीय क्रमांक मिळवला. ‘वुमेन सेफ्टी कॅम्पेनियन चॅटबॉट’ या विषयात पीव्हीपीआयटी, वालचंद, पीव्हीपीआयटी कॉलेजने अनुक्रमे क्रमांक मिळवला.
‘मशिन लर्निंग बेस्ड सिस्टीम टू डिटेक्ट फिशिंग युआरएल’ या विषयात महाडिक कॉलेज, वालचंदने प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला. ‘सिनिअर सिटीझन स्कॅम शिल्ड’ या विषयात डांगे कॉलेज आष्टाने प्रथम क्रमांक मिळवला. तर ‘कम्प्लेंट/ ॲप्लिकेशन ट्रेकिंग सिस्टिम’ या विषयात पीव्हीपीआयटी, वालचंद कॉलेज व डांगे कॉलेज आष्टाने अनुक्रमे क्रमांक मिळवला.
पोलिस अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक बारवकर यांच्याहस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सायबर ठाण्याच्या निरीक्षक रूपाली बोबडे, पोलिस अंमलदार सतीश आलदर, करण परदेशी, रूपाली पवार, रेखा कोळी, विवेक साळुंखे, इम्रान महालकरी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अभिजीत पाटील, अजय पाटील, अजय बेंद्रे, दीपाली नेटके, शांतव्वा कोळी, सलमा इनामदार, सुजाता साळुंखे यांनी संयोजन केले.
पोलिस-विद्यार्थी समन्वय
स्मार्ट कॉप्स हॅकेथॉनमध्ये पोलिसांसमोरील समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन कल्पना विकसित करण्याची संधी देण्यात आली. त्यातून पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय निर्माण करण्यात यश आले.